क्रिकेटची तुलना सैन्यासोबत कशी करता, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 15:56 IST2025-09-30T15:55:33+5:302025-09-30T15:56:31+5:30
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, पोलिसांचे लव्ह लेटर व संताप

क्रिकेटची तुलना सैन्यासोबत कशी करता, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा सवाल
इचलकरंजी : पाकिस्तानसोबत व्यापार, पाणी, विमान व जहाज वाहतूक बंद केली असताना क्रिकेट सामना खेळून काय साध्य केले? क्रिकेट न खेळता जगाला एक वेगळा संदेश देता आला असता. मात्र, ते आपण गमावून बसलो. नेते क्रिकेटची तुलना सैन्यांसोबत करीत आहेत, हे कितपत योग्य आहे, अशी टीका एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
येथील कोल्हापूर नाक्याजवळ असलेल्या मैदानात झालेल्या विशाल जनसभेत ते बोलत होते. ओवेसी म्हणाले, भारतीय खेळाडूंबद्दल आमच्या मनात कोणताही संदेह नाही. आम्ही इंग्लंडला हरवू शकतो, तर पाकिस्तान संघ खूप चिल्लर आहे. त्यांच्यासोबत खेळलो नसतो, तर नुकसान त्यांचे झाले असते, आपले नाही. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून भाजपचे राष्ट्रवादाचे पितळ उघडे पडले आहे. सोलापूर परिसरात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून त्यांना मदत करावी.
प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे करण्याचे बंद करावेत. पाहिजे असेल तर नुकसान झालेल्या गावांची माहिती आम्ही आणून देऊ; पण पूरग्रस्तांना तत्काळ मदत करा. दुसऱ्या पक्षात गुलाम असलेल्या आपल्या लोकांना परत येऊ देऊ नका. त्यांची चाल आम्ही ओळखतो. यावेळी जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, राज्य सहसचिव शफीउल्ला काझी, फय्याज शेख, सचिव समीर बिल्डर, आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवणार
आगामी काळात होणारी आजरा व कुरुंदवाड नगरपालिकेची तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेची निवडणूक एआयएमआयएम पक्ष लढविणार आहे. फक्त मतदार न होता सत्तेत सहभागी व्हा, असे आवाहन ओवेसी यांनी केले.
पोलिसांचे लव्ह लेटर व संताप
भडकाऊ भाषण करू नये, अशी नोटीस ओवेसी यांना पोलिसांनी बजावली. पोलिसांचा समाचार त्यांनी घेतला. पोलिसांनी लव्ह लेटर दिल्याचे सांगत असताना मी चारवेळा खासदार आणि दोनवेळा आमदार राहिलो आहे. कायद्याचे मला ज्ञान आहे. असे असताना मला नोटीस देण्यात आली. यावरून पोलिसांचा खुजेपणा दिसून येतो.
मी पाय रोवून उभा - जलील
कोल्हापुरात येण्यास विरोध करणाऱ्या संघटनांचा समाचार जलिल यांनी आपल्या भाषणात घेतला. कोल्हापूर कुणाची जहागिरी नाही. मी कोल्हापूर आणि इचलकरंजीत आलो आहे आणि येथे ठाम उभारलो आहे असे सांगितले.