"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:18 IST2026-01-13T15:17:46+5:302026-01-13T15:18:15+5:30
दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.

"हेडगेवारांना कारावास झाला होता, पण...", भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील RSS च्या भूमिकेवर ओवेसींनी उपस्थित केला सवाल
राज्यात महापालिका निवडणुकेचे वातावरण जबरदस्त तापले आहे. सर्वच पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसच्या भूमिकेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. "संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांना, ब्रिटिश राजवटीला विरोध केला म्हणून नव्हे, तर खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, म्हणून कारावास झाला होता," असे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभेत बोलत होते. दरम्यान त्यांनी प्रदेशात बांगलादेशी नागरिक असल्याचे दावे फेटाळून लावत, जर असे कोणी आढळल्यास ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले.
भाजपवर टीका करता ओवैसी म्हणाले, "अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करत भाजप हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहे आणि प्रशासनातील अपयशावरून लक्ष विचलित करत आहे. एवढेच नाही तर, ‘इंग्रजांविरुद्ध लढताना संघाचा कुण्या नेत्याला तुरुंगवास झाला?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, "ते म्हणतात,हेडगेवार यांना कारावास झाला होता. मात्र त्यांना खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल कारावास झाला होता. आणि आज ते मुस्लिमांप्रति द्वेष पसरवत आहेत," असा दावाही त्यांनी केला.
ओवेसी पुढे म्हणाले, युसूफ मेहरअली यांनी ‘भारत छोडो’ आणि ‘सायमन गो बॅक’सारख्या घोषणा दिल्या, ते इतिहास वाचत नाहीत आणि आमच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करतात."
बांगलादेश सीमेवरील कुंपणासंदर्भात बोलताना ओवेसी म्हणाले, पोलीस, गुप्तचर यंत्रणा आणि सीमेवर नियंत्रण असूनही 10 किलोमीटरचे कुंपण पूर्ण झालेले नाही. चीन आणि आयएसआय बांगलादेशपर्यंत पोहोचले आहेत आणि इकडे भाजप-आरएसएस बांगलादेश बांगलादेश ओरडत आहेत. दरम्यान आगामी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.