गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:25 IST2025-07-24T15:23:25+5:302025-07-24T15:25:55+5:30

Ganeshotsav 2025 ST Bus Reservation News: गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार भाडेवाढ रद्द करत असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

good news for those going to konkan from mumbai for ganpati 2025 now st bus 30 percent fare hike on single group reservations cancelled | गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द

Ganeshotsav 2025 ST Bus Reservation News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुंबईतील चाकरमान्यांच्या भावना लक्षात घेता यंदा गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी-प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) गेली ७७ वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी सेवा देत आले आहे. महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला फायदा -तोट्याचा विचार न करता दैनंदिन प्रवासा बरोबरच  सण, यात्रा ,उत्सव, लग्नकार्य यासाठी एसटी वेळेवर उपलब्ध करून दिली जाते. विशेषतः गणपती उत्सव, आषाढी यात्रा, होळीचा उत्सव यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार गट आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध करून दिल्या जातात. यंदाही मुंबई व उपनगरातील चाकरमानी- प्रवाशांच्या मागणीनुसार तब्बल ५ हजार जादा एसटी बसेस गणपती उत्सवासाठी सोडण्याचे नियोजन एसटीने  केली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शासनाने दिलेल्या अमृतज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी असलेल्या सर्व सवलती लागू असतात, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द

तथापि, प्रवासी केवळ एकेरी आरक्षण करीत असल्यामुळे परतीच्या प्रवासात एसटी बस मोकळ्या आणाव्या लागतात. त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका एसटीला बसतो. सण उत्सवासाठी राज्यभरातील इतर ठिकाणाहून बसेस एकत्रित करून प्रवाशांना उपलब्ध करून दिलेल्या असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर बसेसची कमतरता निर्माण होते. हे लक्षात घेता हा तोटा आणखीन वाढला जाऊ शकतो! सबब, तो काही प्रमाणात कमी करण्यासाठी एकेरी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटावर ३० टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने नाईलाजाने घेतला होता. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच मुंबई व उपनगरातील मराठी चाकरमान्यांच्या  भावना लक्षात घेता, यंदा एकेरी गट आरक्षणावरील ३० भाडेवाढ रद्द करण्यात येत आहे, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

मागील वर्षी ११.६८ कोटी रुपये नुकसान

मागील वर्षी एसटी महामंडळाने गणपती उत्सवासाठी जाताना ४३३० बसेस व परतीच्या प्रवासासाठी  ११०४ बसेस उपलब्ध करून दिलेल्या होत्या. एकेरी गटारक्षणामुळे गणपती उत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना कोकणात त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवून रिकाम्या बसेस परत आणाव्या लागल्या. त्यांना परतीच्या प्रवासासाठी बसेस उपलब्ध करून देताना  रिकाम्या बसेस राज्याच्या विविध भागातून कोकणात पाठवाव्या लागल्या.  त्यामुळे इंधन खर्च, चालक वाहकांचे वेतन, अतिकालीन भत्ता याचा प्रचंड मोठा आर्थिक बोजा एसटीवर पडला. यातून गणपती उत्सवाच्या काळामध्ये  मिळालेल्या उत्पन्नामध्ये तब्बल ११ कोटी ६८ लाख रुपये  तोटा महामंडळाला सहन करावा लागला. यंदा ५ हजार बसेस सोडण्याचे नियोजन आहे. या सर्व बसेस एकेरी गट आरक्षणासाठी आरक्षित झाल्यास हा तोटा १३ ते १६ कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गणपती उत्सव, मुंबईचे चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. कोकणी माणसाचे एसटीवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. त्यामुळे तोटा सहन करून देखील एसटी  गणपती उत्सव, दिवाळी, होळी या सारख्या उत्सव काळात चाकरमान्यांना नेहमीच प्रवासी सेवा देत आली आहे. यापुढेही देत राहील. चाकरमानी-प्रवाशांनी एसटीच्या आर्थिक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा. सध्या उत्सव काळामध्ये खाजगी बसेस भरमसाट भाडेवाढ करतात. वाढत्या तिकीट दराच्या तुलनेमध्ये एसटीचे तिकीट दर हे अत्यंत कमी आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीने तत्कालीन दरवाढ केल्यास प्रवाशांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

 

Web Title: good news for those going to konkan from mumbai for ganpati 2025 now st bus 30 percent fare hike on single group reservations cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.