बाप्पाच्या ‘रंगा’त रंगले विडी वळणारे हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 10:58 AM2019-08-31T10:58:50+5:302019-08-31T11:02:54+5:30

मुर्तीला नक्षीकाम करण्याचे काम; सोलापुरातील विडी कामगार महिलांना मिळतोय रोजगार

Ganesh Mahotsav; Vidi turns hands on Daddy's 'color'! | बाप्पाच्या ‘रंगा’त रंगले विडी वळणारे हात !

बाप्पाच्या ‘रंगा’त रंगले विडी वळणारे हात !

googlenewsNext
ठळक मुद्देविड्या वळणाºया या महिला कारागीर आपल्या कामात निष्णात झाल्या आहेतजवळपास बारा महिलांना वर्षातून दहा महिने काममहिलांमध्ये उपजतच क्रियाशीलता असते. त्यात विडी कामगार असल्याने त्यांना कष्टाची सवय

यशवंत सादूल 

सोलापूर : उदरनिर्वाहासाठी विड्या वळणारे हात गणपती बनविण्यासोबतच ते अधिक सुंदर व कलात्मक होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र नीलम-श्रमजीवीनगर परिसरातील प्रसिद्ध मूर्तिकार मधुकर कोक्कुल यांच्या कारखान्यात दिसून आले. 

गणेशोत्सव दोन-तीन दिवसांवर आल्याने सर्वच मूर्तिकार आणि कारागीर रात्रभर जागरण करीत बाप्पाच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यासह अंतिम मूर्ती तयार करत आहेत. श्रमजीवीनगर येथील साई आटर््सच्या कारखान्यात मात्र चक्क आठ ते दहा महिला गणेशमूर्तीवर कालाकुसरयुक्त फिनिशिंग कामात मग्न असल्याचे दिसून आले. एरव्ही विड्या वळण्यात मग्न असणाºया या सर्व महिला मूर्तीवर सुंदर कलाकुसर करण्यात मग्न होत्या. कोणी सोंडेवर नक्षी काढत होत्या तर कोणी सोनेरी आभूषणे रंगवीत होत्या. मूर्तीत जिवंतपणा येऊन आकर्षक, सुंदर दिसण्यासाठी सर्व महिला एकाग्र होऊन आपापल्या कामात गुंतलेल्या होत्या.

या महिला बाप्पाच्या मूर्तीतील बारकावे रंगविण्याचे महत्त्वाचे काम करत होत्या. यामध्ये सोनेरी दागिने, किरीट, लोढ, कट्टा, शाल,जानवे, त्रिशूल,गंध, हात आणि पायाची बोटे, मकर, आसन, डोळे आदींचा समावेश होता. 

लहान आकाराच्या घरी स्थापना करण्यात येणाºया या मूर्तीचे बारकावे पाहूनच ग्राहक श्रीची मूर्ती पसंद करतात आणि भावही देतात. हे काम या विड्या वळणाºया महिला कुशलतेने करताना दिसत होत्या. सुंदर कलाकुसरयुक्त नक्षीकाम महिलांना उपजतच जमत असते . या महिलांच्या कलेला विड्या वळण्याच्या कष्टाची जोड असल्याने काम जलद आणि सफाईदार होत होते. साधारणपणे वीस ते पंचवीस मिनिटांत एक मूर्ती याप्रमाणे सर्व मूर्ती रंगवून पूर्ण केल्या जात होते. आधीपासूनच कष्टाची सवय असल्याने सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत ते कलेचा आनंद घेत काम करीत होत्या. 

मूर्तीत जिवंतपणा आणणाºया या महिला कारागीर...

  • - सपना श्रीराम या मागील वीस वर्षांपासून विड्या वळण्याचे काम करीत होत्या. चार-पाच वर्षांपूर्वी झालेल्या विडी कामगारांच्या संपामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत हे काम शिकले. सध्या सुंदर कलाकृती त्या साकारतात. 
  • - अंबिका दोरनाल संपामुळे आलेल्या आर्थिक अडचणीमुळे हे विडी वळण्याचे काम सोडून मूर्तिकला हाच उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून स्वीकारला. पूजा आकेन या पुण्याहून सोलापुरात येऊन स्थायिक झालेल्या कारागीर. पूर्वी त्या पणत्या, मूर्ती रंगविण्याचे काम करत असत. सध्या गणपती मूर्तींची उत्तमरित्या रंगरंगोटी करतात. 
  • - शारदा आडळगे या विडी कामगार महिला होत्या़ आर्थिक परिस्थितीमुळे त्या टॉवेल घडी व शिवणकाम करू लागल्या़ ते कामही सोडून सध्या घरकाम करीत गणपती बाप्पा बनविण्याचे काम करतात .त्यांना या कामात समाधान तर मिळतेच आर्थिक मोबदलाही चांगला मिळतो असे त्यांचे म्हणणे आहे. 
  • - लावण्या सिंगराल या मागील तीन वर्षांपासून मूर्तीकलेत रंगणीचे काम करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी रेखा रासकोंडा यांनाही प्रशिक्षण देऊन या कामात सहभागी करून घेतले आहे़ शालेय जीवनापासून माधुरी कनकी यांचा चित्रकला हा विषय आवडीचा होता.त्यांचे पती साई आर्ट येथे गणपती बनविण्याचे काम करतात़ त्यांनी माधुरींना प्रशिक्षण देऊन आपल्यासोबत मूर्ती रंगणीसाठी घेतले.चित्रकलेची आवड असल्याने त्यांना ही कला लवकर पारंगत झाली.त्या या कलेत निष्णात आहेत.
  • - रेखा रासकोंडा याही गणपती रंगरंगोटी करण्याचे बारीक काम कुशलतेने करतात. यांना आणि सर्व कारागिरांना मधुकर कोक्कूल यांनी वर्षभर काम उपलब्ध करून दिले आहे. या कलेतून अगदी सहज काम केल्याचा आनंद मिळतो.त्यासोबत चांगला मोबदलाही मिळतो, असे सर्व महिलांनी आवर्जून सांगितले.

विड्या वळणाºया या महिला कारागीर आपल्या कामात निष्णात झाल्या आहेत. जवळपास बारा महिलांना वर्षातून दहा महिने काम देतो. महिलांमध्ये उपजतच क्रियाशीलता असते. त्यात विडी कामगार असल्याने त्यांना कष्टाची सवय असते. प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना या कलेची आवड निर्माण होते. त्यामुळे ते कमी वेळात जास्त काम सफाईदार, कलात्मक, सुंदर करतात़ त्यांना त्याप्रमाणे मोबदलाही मिळतो़
- मधुकर कोक्कूल, मूर्तिकाऱ

Web Title: Ganesh Mahotsav; Vidi turns hands on Daddy's 'color'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.