The first contest in the state for assembly election, Congress Vs Shiv Sena in this constituency of karvir | राज्यातील पहिली लढत ठरली, 'या' मतदारसंघात काँग्रेस Vs शिवसेनेचा सामना
राज्यातील पहिली लढत ठरली, 'या' मतदारसंघात काँग्रेस Vs शिवसेनेचा सामना

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर, काही वेळातच काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन.पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेकडून विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील पहिली निवडणूक याच मतदारसंघात ठरल्याचं दिसून येतंय. 

शिवसेनेकडून औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विद्यमान आमदार तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना संधी देण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील सहा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. कागलमधून संजय बाबा घाडगे, चंदगडवरुन संग्राम कुपेकर, करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी सत्यजीत पाटील, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, शिरुळमधून उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

करवीर मतदारसंघ - एन.पी. पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके

एन.पी. पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके ही राज्यातील पहिली लढत ठरली आहे. काँग्रेसने पहिल्याच यादीत करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन.पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पीएन. पाटील हे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय समजले जात. पण, चंद्रदीप नरके यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये एन.पी.पाटील यांचा पराभव केला आहे.  

सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक

कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. कोल्हापूर दक्षिण हा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा मतदारसंघ होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेते अमल महाडिक यांनी त्यांचा पराभव करुन विधानसभा गाठली. त्यानंतर, काँग्रेसकडून सतेज पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे पुतणे आणि संजय पाटील यांचे चिरंजीव ऋतुराज पाटील यांना काँग्रेसकडून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

Web Title: The first contest in the state for assembly election, Congress Vs Shiv Sena in this constituency of karvir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.