अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार 

By अतुल कुलकर्णी | Published: May 5, 2024 08:07 AM2024-05-05T08:07:42+5:302024-05-05T08:08:34+5:30

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

Exchange between Anil Desai, Varsha Gaikwad; Thackeray's Shiv Sainik Congress and Gaikwad activists will work for the Thackeray group | अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार 

अनिल देसाई, वर्षा गायकवाड दोघांमध्ये देवाणघेवाण; ठाकरेंचे शिवसैनिक काँग्रेसचे तर गायकवाडांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे काम करणार 

- अतुल कुलकर्णी 
लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई उत्तर मध्य या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे सेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दोघांमध्ये ‘इस हात लो उस हात दो’ असे नियोजन केले गेल्याची चर्चा आहे. ही देवाणघेवाण किती यशस्वी ठरते यावरही या दोन उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.

मुंबई दक्षिण मध्य हा मतदारसंघ वर्षा गायकवाड यांना हवा होता. या मतदारसंघातून त्यांचे वडील एकनाथ गायकवाड २००४ आणि २००९ या दोन लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ मध्ये येथून तेव्हाच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे निवडून आले. आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे उभे आहेत. या मतदारसंघात धारावीचा मोठा भाग येतो. वर्षा गायकवाड धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. आपले वडील ज्या ठिकाणी पराभूत झाले त्याच मतदारसंघातून आपल्याला निवडून घ्यायचे आहे अशी त्यांची भावना होती. तर शिवसेना भवन या मतदारसंघात येते त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याला हवा अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. 

धारावी पुनर्विकासाचा विषय गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. हे काम अदानी समूहाला मिळालेले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाचे मुख्यालय या मतदारसंघात आहे किंवा उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान मुंबई उत्तरमध्ये आहे, या गोष्टीपेक्षाही धारावी पुनर्वसनाचा विषय दोन्ही उमेदवारांसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळेच या मतदारसंघासाठी दोन्ही बाजूने हट्ट सुरू होता असे सांगितले जाते. पण शेवटी अनिल देसाई यांनाच मुंबई दक्षिण मध्यमधून उमेदवारी जाहीर झाली. 

मुंबई उत्तर मध्यमधून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उज्वल निकम आहेत. एमआयएमचे रमजान चौधरी यांनीही याच मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. या मतदारसंघात ४,२७,१०० एवढे मुस्लिम मतदार आहेत. 

एमआयएमची उमेदवारी भाजप पुरस्कृत असल्याचे बोलले जात असले तरी, मुस्लिम मतदार यावेळी भाजपला मदत करणाऱ्यांसोबत जातील का? असा तर्क यासाठी दिला जात आहे. मुंबई उत्तर मध्य मध्ये  ५,६७,१०० इतके सर्व समाजाचे मराठी मतदार आहेत. त्यामुळे या मतांची विभागणी होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मतदान याच मतदारसंघात आहे. त्यामुळे त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करेन. हाताचे बटण दाबेन, असे जाहीरपणे सांगितले होते. 

गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड या दोन मतदारसंघांसाठी नियोजन सुरू आहे. मुंबई उत्तर मध्य मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या शिवसैनिकांनी वर्षा गायकवाड यांचे काम करावे यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांची माणसे कामाला लावली आहेत. 
माजी मंत्री अनिल परबही वर्षा गायकवाड यांच्यासाठी काम करत आहेत. ठाकरे यांनी आपल्या विश्वासातील काही लोकांना वर्षा गायकवाड यांच्यासाठी कार्यालय स्थापन करण्यापासून अनेक गोष्टींची जबाबदारी सोपवली आहे. ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांच्यासाठी कलिनामधून संजय पोतनीस यांना कामाला लावले आहे. ते तिथले आमदारही आहेत. 
याच पद्धतीने धारावीमधून उद्धवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी वर्षा गायकवाड यांनी यंत्रणा कामाला लावली आहे. या दोघांमधील ही देवाणघेवाण व्यवस्थित पार पडली, तर मतांचे गणित सोपे जाईल असे दोन्ही बाजूंचे म्हणणे आहे.

 मुंबई दक्षिण मध्यमधील विद्यमान आमदार
  नवाब मलिक, अणुशक्ती नगर (अजित पवार गट) 
  प्रकाश पातरपेकर, चेंबूर (उद्धवसेना) 
  वर्षा गायकवाड, धारावी (काँग्रेस) 
  कॅप्टन आर तमिल सेलवन, 
सायन कोळीवाडा (भाजप)
  कालिदास कोळंबकर, वडाळा (भाजप) 
  सदा सरवणकर, माहीम (शिंदेसेना)

 मुंबई उत्तर मध्यमधील  विद्यमान आमदार 
 पराग अळवणी, विलेपार्ले (भाजप) 
 दिलीप लांडे, चांदीवली (शिंदेसेना) 
 मंगेश कुडाळकर, कुर्ला (शिंदेसेना) 
 संजय पोतनीस, कलीना (उद्धवसेना) 
 झिशान सिद्दिकी, बांद्रा, पूर्व 
(अजित पवार गट)
 आशिष शेलार, बांद्रा, प. (भाजप)

Web Title: Exchange between Anil Desai, Varsha Gaikwad; Thackeray's Shiv Sainik Congress and Gaikwad activists will work for the Thackeray group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.