Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 16:40 IST2025-05-21T16:38:23+5:302025-05-21T16:40:41+5:30
Nala Sopara Drugs News: शहरात एकापाठोपाठ एक अंमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या घटना समोर आल्या

Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
मंगेश कराळे, नालासोपारा: शहरात एकापाठोपाठ एक अंमली पदार्थाच्या तस्करी होण्याच्या घटना समोर आल्या. बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास पूर्वेकडील मोरेंगाव तलाव येथील एका इमारतीच्या खाली अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या नायजेरियन आरोपीला अटक केली. अंथोनी ओडिना (वय, ४३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ कोटी ५० लाखांचा १ किलो १२५ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
वसई विरार शहरातील विविध ठिकाणच्या भागात छुप्या मार्गाने अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बुधवारी सकाळी मोरेंगाव तलाव परिसरातील प्रियंका बिल्डिंगच्या खाली एक आरोपी अंमली पदार्थ तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तुळींज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथक व एटीसी पथकाने सापळा रचून संशयित नायजेरियन आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता १ किलो १२५ ग्रॅम वजन असलेला २ कोटी ५० लाख रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ आढळून आला आहे.
याप्रकरणी अंथोनी ओडिना या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोवैद्यानिक परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट ) कलम ८ (क), २१ (क), २२,२९ सह विदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम १४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील सात दिवसांत तुळींज पोलिसांनी प्रगतीनगर, सेंट्रल पार्क आणि बुधवारी मोरेंगाव या तीन ठिकाणी तीन कारवाई करून ९ कोटी ७० लाख रुपयांच्या मुद्देमालासह तीन नायजेरियन आरोपींना अटक केली.