“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:42 IST2025-12-24T14:39:44+5:302025-12-24T14:42:33+5:30
Congress Vijay Wadettiwar News: मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
Congress Vijay Wadettiwar News: महाराष्ट्र,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला, असे मानण्याचे कारण नाही, असेही काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे
मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे. मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती. मनसेबाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती, असे वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहन यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.