“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:43 IST2025-12-31T15:41:12+5:302025-12-31T15:43:37+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: मूळ पक्ष कार्यकर्ते व संघ कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भाजपा गेला असून, लवकरच याचे नियंत्रण रेशीम बागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, अशी टीका करण्यात आली आहे.

“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून दुसऱ्या पक्षातील आयत्यावेळी आलेल्यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. भाजपामध्ये ही नाराजी राज्यभर सर्वदूर दिसत असून ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्तामुक्त भाजपा’ झाला आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नगरसेवकपदासाठी भाजपामध्ये प्रचंड गोंधळ माजल्याचे चित्र दिसत आहे आणि हेच चित्र आगामी विधानसभा निवडणुकतही दिसेल. मूळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
गुंडांचाच पक्ष आहे तो, याआधी त्यांनी माफियांना प्रवेश दिला
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गुंडांचाच पक्ष आहे तो, याआधी त्यांनी माफियांना प्रवेश दिला. मराठवाड्यात एका किंगला पक्षात प्रवेश दिला. कोयता गँगशी संबंधित लोक त्यांच्या पक्षात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले असे सपकाळ म्हणाले.
दरम्यान, २०२६ हे वर्ष काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष आहे आणि त्याची तयारी डिसेंबर महिन्यापासूनच झाली आहे. काँग्रेसचे हौसले बुलंद आहेत, पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत. वैचारिक कटिबद्धता आहे आणि वैचारिक मेळ व मूठ बांधण्याचे काम नवीन वर्षात करणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.