उल्हासनगरात शिंदेसेनेत गृहकलह? बॅनरवर अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:42 IST2026-01-08T19:39:25+5:302026-01-08T19:42:37+5:30
उल्हासनगरच्या प्रभाग क्र. १० मध्ये शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या प्रभागातच पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. रिपाई (आठवले गट) आणि शिंदेसेना युतीच्या अधिकृत उमेदवार गौतमी बागुल यांचा फोटो चक्क पोस्टर्सवरून गायब करण्यात आला असून, तिथे एका अपक्ष उमेदवाराचा फोटो लावण्यात आला आहे.

उल्हासनगरात शिंदेसेनेत गृहकलह? बॅनरवर अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराचा फोटो
उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रं-१० मधून शिंदेसेनेकडून महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी महापौर राजश्री चौधरी, रविंद्र निकम व गौतमी बागुल रिंगणात आहेत. प्रत्यक्षात गौतमी बागुल यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार दवने यांचा फोटो शिंदेसेनेच्या पोस्टर्सवर झडकल्याने, शिंदेसेनेतील अंतर्गत वाद निवडणुकीत चव्हाट्यावर आला आहे.
उल्हासनगर शिंदेसेनेची कमांड सांभाळणारे महानगरप्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या प्रभागातील वाद चव्हाट्यावर आल्याने, राजकीय खळबळ उडाली. चौधरी यांच्यासह त्यांच्या पत्नी राजेश्री चौधरी, कट्टर कार्यकर्ता रविंद्र निकम व दुसऱ्या कार्यकर्त्याची मुलगी गौतमी बागुल असे चार जण प्रभाग क्रं-१० मधून रिंगणात आहेत. गौतमी बागुल यांना रिपाई आठवले गटाच्या कोट्यातून उमेदवार मिळाल्याचे रिपाईचे म्हणणे आहे. गौतमी बागुल ह्या रिपाई आठवले गटाचे शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल यांच्या सून आहेत. गेल्या महापालिका निवडणुकीत बागुल यांच्या पत्नी पुष्पा बागुल ह्या शिवसेनेच्या तिकिटावर याच प्रभागातून नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या. त्यांच्या जागी गौतमी बागुल यांना रिपाई आठवले गटाच्या कोट्यातुन उमेदवारी दिली आहे.
एकीकडे पक्षांकडून अन्याय होत असताना शिंदेसेना रिपाई युतीच्या उमेदवार गौतमी बागुलसह समर्थक शिंदेसेनेच्या पक्षाच्या चिन्हावर बटण दाबण्याचे आवाहन मतदारांना करीत आहेत. रिपाईचे शहरजिल्हाध्यक्ष नाना बागुल यांनी शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी व त्यांच्या समर्थकांनी रिपाई सोबत युती धर्म पाडण्याची प्रतिक्रिया दिली. शहरांत आंबेडकरी समाज मोठा असून त्याचे परिणाम निवडणूक उमटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तर राजेंद्र चौधरी यांनी पोस्टर्स, बॅनरवर शिंदेसेना रिपाईचे उमेदवार गौतमी बागुल यांचा फोटो गायब होऊन अपक्ष उमेदवारांचा फोटो काही ठिकाणी असल्याचे मान्य केले. त्यामध्ये त्वरित दूरस्ती करून पक्षांचे उमेदवार गौतमी बागुल यांचा फोटो बॅनर्स व पोस्टरवर लावण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.