भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 08:04 IST2026-01-01T08:04:17+5:302026-01-01T08:04:44+5:30
शक्तिशाली बंडखोरांशी मुख्यमंत्री बोलले; पक्षांतर्गत नाराजी रोखण्यासाठी केेल्या सूचना; असंतोषाने वाढविली डोकेदुखी

भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
यदु जोशी -
मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी बंडखोरांनी अनेक ठिकाणी वाढविली असल्याचे चित्र असताना बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपासून पुढाकार घेतला आहे. असंतुष्टांची मोठी संख्या असलेल्या शहरांमधील प्रमुख नेत्यांना त्यांनी फोन केले व बंडाळी थांबविण्यास सांगितले. काही शक्तिशाली बंडखोरांशी ते स्वत: बोलल्याची माहिती आहे.
कोणकोणत्या बंडखोरांमुळे मोठा फटका बसू शकतो याची माहिती फडणवीस यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी फोन सुरू केले. पक्षाचे स्थानिक नेते, आमदार, खासदार आणि विभागीय संघटन मंत्री यांच्याशी चर्चा केली आणि पक्षांतर्गत नाराजी कशी रोखता येईल, याबाबत काही सूचनादेखील केल्या.
दिलेला शब्द : पक्षनिष्ठा वाया जाणार नाही
महापालिकेत उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक असताना एकालाच उमेदवारी देणे शक्य होते, पण तुमची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही, नजीकच्या भविष्यात त्याची नक्कीच दखल घेतली जाईल, असा शब्द माझ्याकडून द्या, असे मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले.
उमेदवारी डावलेल्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य, जिल्हा, विभागीय वा राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी, विविध महामंडळांवर संधी दिली जाईल किंवा पक्षसंघटनेत पदे दिली जातील, अशी ऑफर देण्यात
आली आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांची काढली विशेष समजूत
फडणवीस यांनी बंडखोरांना समजविण्यासाठी स्वत: काही फोन विविध शहरांमध्ये केले. जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांची त्यांनी विशेषत: समजूत काढली. सरकार आपले आहे, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे. आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात तो नक्कीच देता येईल, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर, नाशिक ठरले हॉटस्पॉट
भाजपअंतर्गत सर्वाधिक बंडखोरी आणि असंतोष हा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याविरुद्धचा रोष डावललेले इच्छुक मांडत आहेत. नाशिकही बंडखोरीचा हॉटस्पॉट बनला आहे. मंत्री गिरीश महाजन संकटाचे केंद्रबिंदू बनले आहेत.
नाराजांना शांत करण्याची जबाबदारी या नेत्यांवर
नाराजांना शांत करण्यासाठीची जबाबदारी विविध नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री आणि प्रमुख भाजप नेत्यांविरुद्ध तिकिटे कापल्याने संताप आहे.
त्यामुळे त्यांच्यावर बंडखोरांना शांत करण्याची जबाबदारी न देता मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूत्रे स्वत:कडे घेतली आहेत.
एका निष्ठावंताला डावलून दुसऱ्याला तिकीट दिले तिथे तेवढी नाराजी नाही, पण कालपरवा पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली अन् वर्षानुवर्षांच्या निष्ठावंतांना डावलले अशा ठिकाणी असंतोष प्रचंड आहे.