मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार; टॉक शो, रोड शो आणि नामवंतांच्या गाठीभेटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 09:40 IST2026-01-03T09:38:46+5:302026-01-03T09:40:09+5:30
भाजप-शिंदेसेना प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी संयुक्त मेळावा शनिवारी सायंकाळी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील...

मुख्यमंत्री फडणवीस करणार हटके प्रचार; टॉक शो, रोड शो आणि नामवंतांच्या गाठीभेटी
मुंबई : सभा, मेळाव्यांना संबोधित करणे ही निवडणूक प्रचाराची परंपरागत पद्धत पण ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत:पुरती महापालिका निवडणुकीसाठी बदलणार आहेत. सभा तर ते घेतीलच पण थेट लोकांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण पद्धतीने प्रचार करण्यावर ते भर देणार आहेत.
महापालिकांमधील मतदार हा संपूर्णत: शहरी असतो आणि त्याच्या इच्छा-आकांक्षाही वेगळ्या असतात. त्या समजून घेत त्यावर मुख्यमंत्री म्हणून आपण काय करणार आहोत ते विविध समाजघटकांना भेटून फडणवीस सांगणार आहेत. केवळ मुंबईतच नाही तर राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये ते अशा पद्धतीने संवाद साधतील. त्यासाठी ठिकठिकाणी त्यांच्या टॉक शोचे आयोजन भाजपतर्फे करण्यात येणार आहे. काही ठिकाणी त्यांच्या प्रकट मुलाखतींचे कार्यक्रमही होणार आहेत.
फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत मेळावा
भाजप-शिंदेसेना प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी संयुक्त मेळावा शनिवारी सायंकाळी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या मेळाव्यात मार्गदर्शन करतील. प्रचाराची ही पहिलीच सभा असल्याने उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्या युतीबद्दल फडणवीस-शिंदे काय बोलतात याकडे लक्ष असेल.
शहर विकासाचे व्हिजन मांडणार
राज्यातील सर्व २९ महापालिकांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचारसभा होतील. तसेच, काही महापालिकांच्या शहरांमध्ये ते रोड शो करणार आहेत. नगर परिषद निवडणुकीत फडणवीस यांनी अगदी पहिल्या प्रचारसभेपासून कोणावरही टीका न करता सकारात्मक प्रचार केला होता. लहान शहरांच्या विकासासाठी आपले विकासाचे व्हिजन त्यांनी मांडले होते.
मित्रपक्ष शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) हे अनेक ठिकाणी त्यावेळी भाजपच्या विरोधात लढले होते. यावेळीही तीच स्थिती आहे. फडणवीस हे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भाषणे करताना महानगरांच्या विकासाचा अजेंडा मांडणार आहेत. मुंबईत ठाकरे बंधू आणि नागपुरात काँग्रेस मात्र त्याला अपवाद असेल असे म्हटले जात आहे.