Raj Thackeray Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 17:41 IST2022-09-01T17:41:07+5:302022-09-01T17:41:51+5:30
मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

Raj Thackeray Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!
Raj Thackeray Eknath Shinde: राज्यातील सत्तांतरानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले. यंदा पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियांनी घरी गणपती बसवला असून गणेश दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी राज ठाकरेंच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गप्पाही रंगल्या. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंकडील बाप्पांचं दर्शन घेतलं, गप्पाही रंगल्या!#RajThackeray#EknathShinde#Ganeshotsavpic.twitter.com/M3Jv43QKwZ
— Lokmat (@lokmat) September 1, 2022
२ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. तब्बल ५० आमदारांना सोबत घेत शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच धक्का दिला. शिंदे यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता निसटली. त्यानंतर खरी शिवसेना आम्हीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शिंदे गटातील आमदारांबद्दल राज यांनी केलं होतं सूचक वक्तव्य
शिवसेनेतील या फुटीमुळे ठाकरे घराण्यातील महत्त्वाचे नेते असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी प्रदीर्घ मुलाखत देत या संपूर्ण प्रकारावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना दोषी धरलं. त्याचसोबत उद्धव ठाकरे विश्वासार्ह व्यक्ती नाही असं सांगत राज यांनी थेट हल्लाबोल केला. त्यानंतर शिंदे गट मनसेत विलीन करण्याची वेळ आली तर विचार करू असंही राज ठाकरेंनी म्हटलं होते.