...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 16:21 IST2026-01-14T15:34:33+5:302026-01-14T16:21:30+5:30
३ वर्षात आम्ही एवढे यश मिळवले ही सोपी गोष्ट नाही. संघटना मजबूत करणे, पक्ष वाढवणे हे सगळे पुढे करायचे आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
मुंबई - खुर्ची आणि सत्ता याची लालसा मला कधीच नव्हती. मी अडीच वर्षात मुख्यमंत्री म्हणून खूप काम केले. या महाराष्ट्राची सेवा करता आली. लाडकी बहीणसारखी योजना मला आणता आली. अनेक योजना, रखडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेले. लाडक्या बहीण योजनेमुळे लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली आणि ही ओळख सर्व पदांपेक्षा मोठी आहे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्याशिवाय राज ठाकरे यांनी महापालिका निवडणूक प्रचारात शिंदेंवर टीका करणे का टाळले यावरही त्यांनी खुलासा केला.
'लोकमत व्हिडीओ'चे संपादक आशिष जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. त्यात ते म्हणाले की, काही लोकांनी एकनाथ शिंदेंना ओळखले नाही. मी सत्ता आणि खुर्चीसाठी लालची नाही. मी तेव्हाही म्हणत होतो, लोकांनी जे बहुमत दिले त्याचा सन्मान करू. कुणी फसवलं, कुणी काय केले हे सोडा आपण युती करूया..पण त्यांचा ५ वर्ष सत्तेत राहण्याचा विचार पक्का होता. पण दुसरीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होते. शेवटी आपण एक समान विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे आलोय असं सांगत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याशिवाय मी कुठला गुन्हा केला नाही. एखादा जमीन घोटाळा, भ्रष्टाचार असे मी कधी केले नाही. त्यामुळे काही लोक जे खोटे आरोप करतात, खोटं बोल पण रेटून बोल असं करतात. ते राज ठाकरेंनी टाळले असेल असंही शिंदेंनी म्हटलं.
तर राज ठाकरे यांचा निवडणुकीतील सर्वात मोठा पराभव होईल असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावरही शिंदेंनी भाष्य केले. निवडणुकीनंतर काय होईल त्यावर आत्ताच काय बोलणे हे आततायीपणाचे होईल. शेवटी जनता जनार्दन ठरवत असते. कुणी कितीही काही बोलले, अंदाज लावला तरी जनतेच्या मनात काय हे मतपेटीत दिसते. त्यामुळे १६ तारखेला कळेल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या कामगिरीवर बोलणं टाळले.
दरम्यान, शेवटी कुणी कुणासोबत येऊ शकते. कार्यकर्ता हा पक्ष वाढवत असतो. त्याच्या मागे उभं राहण्याचं काम आपण करायला हवे. त्यात सातत्य हवे. महापालिका, जिल्हा परिषद झाल्यानंतर संघटनेकडे लक्ष द्यावे लागेल. ३ वर्षात आम्ही एवढे यश मिळवले ही सोपी गोष्ट नाही. संघटना मजबूत करणे, पक्ष वाढवणे हे सगळे पुढे करायचे आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. लोकसभा असो विधानसभा आमच्याकडे मतांची टक्केवारी उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आहे. नगरपरिषदेतही तेच झाले आणि आता महापालिकेतही तेच होईल. संसदीय आणि संघटनात्मक इथेही आमची ताकद जास्त आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण आम्हाला दिले आहे. कोर्टात प्रकरण असल्यामुळे त्यावर अधिक भाष्य करू शकत नाही. पण बहुमताला महत्त्व असते असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
तुम्ही का केले नाही...?
आम्ही काम करणारे आणि रिझल्ट देणारे लोक आहोत. मुंबईकर सुज्ञ आहेत. आज मुंबईकरांना वाहतूक कोंडी, खड्डे, फुटपाथ, प्रवासाचा त्रास आहे. हा त्रास कमी कसा होईल हे पाहणारे लोक हवेत. मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात आधी खड्डेमुक्त प्रवास यावर फोकस केला. त्याचा परिणाम दिसतोय. मुंबईत बऱ्यापैकी रस्ते सिमेंट काँक्रिटचे झालेत. पुढच्या वर्षीपर्यंत १०० टक्के काँक्रिटचे रस्ते दिसतील. खड्ड्यांमुळे किती बळी गेले, लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही. मेट्रोला स्थगिती दिली होती, आम्ही सगळी स्थगिती उठवली. लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दिला. तुम्ही हे का केले नाही. ते करायला हवे होते ना...मुंबईकर मुंबई बाहेर फेकला गेला ते कुणामुळे? SRA प्रकल्प राबवले, त्यांना भाडे नाही आणि घरेही मिळत नाही. ३० वर्ष रमाबाई आंबेडकर नगर येथे प्रकल्प रखडवला. आम्ही ते लोकांना देतोय असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
गणेश नाईकांना प्रत्युत्तर
मला आरोपांशी देणेघेणे नाही. माझे लक्ष मी कामावर ठेवले आहे. गेले साडे तीन वर्ष मी आरोप सहन करतोय. एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची पोटदुखी किती जणांना आहे, मी आरोप सहन करत मी पुढे चाललोय. त्यामुळे माझ्यावरील आरोपांना मी उत्तर देत नाही. त्यांच्याकडे बघतही नाही. माझा फोकस फक्त विकास आणि कामावर ठेवतोय. जेवढे माझ्यावर आरोप करतील तेवढी जनता माझ्यासोबत येतेय. मी निवडणूक लढतोय. काम करतोय. कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना भेटतो. प्रचार करतोय असं सांगून एकनाथ शिंदे यांनी भाजपा नेते गणेश नाईकांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली.