"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 18:37 IST2026-01-02T18:35:47+5:302026-01-02T18:37:34+5:30
ठाकरे बंधू एकत्र आले त्याचे शंभर टक्के मी श्रेय घ्यायला तयार आहे. मी त्यांचे आभार मानतो. बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती, परंतु ते जमलं नाही. ते जर मी केले असेल तर मराठी माणसांना एकत्रित आणण्याचं काम मी केले आहे असं फडणवीस यांनी सांगितले.

"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
मुंबई - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच युतीने निवडणुकीला सामोरे जात आहे. मात्र या युतीमुळे भाजपासमोर आव्हान उभे राहिलंय का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत मुंबईतलं मतांचे गणित समजावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे बंधू एकत्र आलेत त्याची आम्हाला चिंता नाही. आम्हाला त्यातून संधी जास्त दिसतेय. या दोघांचे प्राबल्य एकाच भागात आहे. तिथे आमची मते कधी हलले नाहीत. आमची मते कायम राहिली आहेत. एकाच भागावर ते दोघे प्राबल्य दाखवत असल्याने कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अडचणी तयार झाल्या आहेत असं त्यांनी म्हटलं.
तसेच ठाकरे बंधू एकत्र आले त्याचे शंभर टक्के मी श्रेय घ्यायला तयार आहे. मी त्यांचे आभार मानतो. बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती, परंतु ते जमलं नाही. ते जर मी केले असेल तर मराठी माणसांना एकत्रित आणण्याचं काम मी केले आहे. पण आता ठाकरे बंधूंच्या युतीला खूप उशीर झाला आहे. दोघांची मते संपल्यानंतर ते एकत्रित आलेत. २००९ साली एकत्र आले असते तर वेगळा निकाल लागला असता. आता एकत्र येऊन काही फायदा नाही. दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी झाली आहे. ज्यात मराठी माणसेही त्यांना मत देणार नाही आणि अमराठीही मत देणार नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्याची आम्हाला काही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे निवडून येऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
... शिवसेनेसोबत युती तुटली
दरम्यान, महापालिका निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांचे मन सांभाळावे लागते. आम्ही प्रत्येक ठिकाणी युतीचा प्रयत्न केला परंतु काही जागांवरून युती तुटली, तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू. १२ ठिकाणी भाजपा-शिवसेनेची युती झालीय, काही ठिकाणी ते आणि राष्ट्रवादी युती झालीय. काही ठिकाणी भाजपा राष्ट्रवादीची युती झालीय. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती झालीच पाहिजे असा माझा आग्रह होता. मात्र तिथे एका प्रभागात दोन्ही बाजूंनी दावा केला. त्यातून युती तुटली. स्थानिक नेत्यांचे मन सांभाळावे लागते. सीटिंग नगरसेवकाची जागा का द्यायची असं त्यांचं म्हणणे होते. दोन्ही बाजूने प्रस्ताव दिला परंतु तो मान्य झाला नाही आणि युती तुटली असं फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. मुंबई तकच्या मुलाखतीत त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिले.
मराठी मते आमचीच, मुंबईतलं मराठीपण कायम राहील
मराठी व्होटबँक आमची आहे. मराठी माणसांनी भाजपाला मतदान केले नसते तर सलग ३ निवडणुकीत आमचे १५ आमदार निवडून येतायेत. दुसरे कुणाचे आले नाहीत. कुणीही दावा करू द्या. भाजपाच नंबर वन राहिला आहे. सगळ्या मराठी भागात आम्ही निवडून येतो. त्यामुळे आमचा मराठी आहे, अमराठी आहे आणि सगळेच आमचे आहेत. मुंबईतलं मराठीपण कुणी घालवू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.