“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:24 IST2025-12-25T15:22:01+5:302025-12-25T15:24:58+5:30
BJP Raosaheb Danve News: ठाकरे बंधूंनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असे वागावे, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
BJP Raosaheb Danve News: दोन्ही बंधू एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे. दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असे वागावे. दोन्ही भावांवर एकदाच टीका नको. त्यांचे एकदा होऊन जाऊ द्या, असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी भाजपाची संगत सोडून हिंदुत्वाला सोडले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता. त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसला. ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपापल्या सोईने दुसऱ्या पक्षात जातील. तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत आहे. हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राहणार नाही, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली होती. या टीकेला ठाकरे बंधूंनी प्रत्युत्तर देत टोलेबाजी केली. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला आता पुन्हा रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले आहे.
मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांना आता त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही, अशी टीका केली होती. यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, भाजपाने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री व राज्यात पक्षाचा अध्यक्ष केले. पक्षात कोणी विचारत नसते तर असे केले असते का? माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार आहे. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून, शेपूट खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे. त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. डरकाळ्या मारत मी विधानसभेत अन् लोकसभेतही गेलो, असा पलटवार दानवे यांनी केला.
आता हरले तर कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर राहून काही अस्तित्वच राहणार नाही
२०१९ आणि २०२४ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली. भाजपाला सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. त्यांचे अडीच वर्षांचे सरकार या राज्यातील लोकांना आवडले नाही. सत्तांतर झाले. त्यांचा एक-एक शिलेदार त्यांना सोडून गेला. एकीकडे त्यांच्या युतीची पत्रकार परिषद सुरू होती, दुसरीकडे कार्यकर्ते त्यांना सोडून चालले होते. हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाहीत, कारण प्रचारासाठी फिरताना मला ते समजत होते. आता जर ते हरले तर कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर राहून काही अस्तित्वच राहणार नाही. म्हणून सगळे कार्यकर्ते त्यांना सोडून जातील, असा दावा दानवे यांनी केला.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की, ही उद्धव ठाकरे यांची शेवटची निवडणूक आहे. यानंतर त्यांच्या पक्षात कार्यकर्तेच राहणार नाही, असे लोक म्हणत आहेत. त्यावर राज ठाकरे यांनी विचारले की, लोक म्हणजे कोण? त्यावर पत्रकाराने भाजपा नेते रावसाहेब दानवेंचे नाव घेतले. यावर राज ठाकरे हे उद्धव यांच्या मदतीला धावून आले आणि सांगितले की, मला असे वाटते की, उत्तरे देवाला द्यावीत, दानवांना नाही.