"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:29 IST2026-01-07T19:27:50+5:302026-01-07T19:29:04+5:30
AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं.

"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
अकोला - अकोट नगरपरिषदेत भाजपाने एमआयएमसोबत युती केल्यानं राज्यभरात विरोधकांनी भाजपावर तोंडसुख घेतले. हे प्रकरण अंगाशी येताच मुख्यमंत्र्यांनी यावर नाराजी व्यक्त केली तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाकळे यांना नोटीस बजावली. मात्र या घटनेवरून अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. माध्यमे आणि विरोधकांनी संपूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही असं सांगत सावरकरांनी एमआयएमच्या नगरसेवकांनी पक्षाशी फारकत घेतल्याचा दावा केला.
आमदार रणधीर सावरकर म्हणाले की, एमआयएमच्या विचारधारेशी फारकत घेत त्यांना सोडचिठ्ठी देत ४ नगरसेवक अकोट विकास मंचाकडे आले. या आघाडीत भाजपाचे ११ नगरसेवक आहेत त्यामुळे ही आघाडी भाजपाप्रणित आहे हे समजण्याइतके ते दुधखुळे नाहीत. या नगरसेवकांनी आमचे विचार स्वीकारले आणि एमआयएमचे विचार सोडले म्हणून आघाडी झाली. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नव्हता. AIMIM सारख्या जातीयवादी संघटनेची विचारधारा सोडून मुस्लीम समाजाचे नगरसेवक आघाडीत सहभागी होत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं त्यांनी म्हटलं.
तसेच अजूनही आपण या नगरसेवकांना विचारून घेऊ, तुम्ही एमआयएमचे विचार सोडणार असतील तर आजही आम्ही त्यांचे स्वागत करायला तयार आहोत. जर ते विचार सोडणार नसतील तर आमचा आणि त्यांचा संबंध नाही. राज्याचे मुख्यमंत्री आपल्या विचाराशी खूप प्रामाणिक आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. AIMIM सोबत युती करण्याचा प्रयत्न झालाच नाही. पण झाला असेल तर ते आम्हाला दाखवून द्यावे. निश्चित संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.
दरम्यान, अकोट विकास मंचमध्ये नगरसेवक एकत्र येऊन युती झाली आहे परंतु एमआयएमसोबत युती झाली नाही. अकोट विकास मंच ही आघाडी कागदोपत्री आहे त्याला कुठलीही मान्यता नाही. जिल्ह्याचे त्याला समर्थन नाही. राज्यातील भाजपाचे त्याला समर्थन नाही. ही स्थानिक पातळीवर आघाडी झाली. हा एक प्रयोग होता. एमआयएमचे विचार सोडून ते ४ नगरसेवक सोबत आणण्याचा, मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी असंही आमदार रणधीर सावकर यांनी स्पष्ट केले.