मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 16:51 IST2025-07-13T16:51:07+5:302025-07-13T16:51:32+5:30
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट आले होते.

मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
सोलापूर: अक्कलकोटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad Sambhaji brigade) यांना आज (दि.१३) शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फासलं आहे. तसेच, गायकवाड यांच्या अंगावर शाईदखील ओतण्यात आली. एका शिक्षण संस्थेच्या आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड सोलापूर दौऱ्यावर आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गायकवाड आज अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. अक्कलकोटमध्ये आल्यानंतर शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्त यांनी प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई ओतली. गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होती. तसेच, स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करुन त्यांचा अवमान केल्याचादेखील राग या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.
प्रवीण गायकवाड यांना सत्कार समारंभाच्या ठिकाणीच काळे फासण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. यादरम्यान, त्यांना गाडीतून बाहेर खेचत धक्काबुक्कीदेखील झाली. त्यांचे कपडेही फाडण्यात आले. यावेळी ते हात जोडून सर्वांची माफी मागताना दिसले. दरम्यान, या घटनेनंतर इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अद्याप प्रवीण गायकवाड यांनी या प्रकरणावर कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.