Bhujbal Problem in Assembly Elections | भुजबळांना गड राखताना होणार दमछाक

भुजबळांना गड राखताना होणार दमछाक

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढून बाहेर आल्यावर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी आपले गड राखण्याचे आव्हान उभे आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवास तोंड द्यावे लागल्यामुळे भुजबळांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. त्यातच भुजबळांच्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा भुजबळ यांना अडचणीची जाणार असल्याचे बोलले जात आहे.

भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. विशेष म्हणजे भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवला-लासगाव येथे शिवसनेने आपली ताकद वाढवली आहे. त्यातच नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांनी शिवबंधन बांधल्याने सेनेचे पारडे जड झाले आहेत. कधीकाळी भुजबळांच्या ताब्यातील पंचायत समिती आणि नगरपरिषदेतील सत्ता सुद्धा आता सेनेकडे आहे. तर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ३ जागा ह्या आता सेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे आपलं वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी भुजबळांची कसोटी लागणार आहे.

मतदारसंघात वाढत्या अडचणी लक्षात घेता, भुजबळ औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते लवकरच यासाठी भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. वैजापूर मतदारसंघात ओबीसी मतदार मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे याचा फायदा भुजबळांना होऊ शकतो. मात्र याबाबतीत भुजबळांची कोणतेही अधिकृत प्रतिकिया आतापर्यंत समोर आलेली नाही.

पक्षांतर्गतही अडथळे

मतदारसंघात विरोधकांबरोबर पक्षांतर्गतही भुजबळांसमोर अडथळे आहेत. भुजबळ यांनी विधान परिषदेसाठी पाठवण्याचा शब्द दिला होता, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाहीत म्हणून, नाराज असलेले भुजबळांचे सहकारी माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा रश्मी पालवे यांनी काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास इतर पक्षातून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhujbal Problem in Assembly Elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.