बाळासाहेब थोरातांचा १ लाख नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:01 IST2025-10-15T17:59:00+5:302025-10-15T18:01:36+5:30
Raj Thackeray News: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबाबत एक सनसनाटी दावा केला. आठ वेळा ८० ते ९० हजार मतांनी निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांचा लाखभर मतांनी पराभव कसा काय झाला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मात्र हा दावा चुकीचा असल्याची माहिती आता समोर येत आहे.

बाळासाहेब थोरातांचा १ लाख नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह मनसेप्रमुख राज ठाकरे हे मतदार याद्यांमधील त्रुटी आणि कथित मतचोरी विरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच आज सलग दुसऱ्या दिवशी या नेत्यांनी राज्य निवडणूक आयोगात धाव घेत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आरोप केले. यादरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबाबत एक सनसनाटी दावा केला. आठ वेळा ८० ते ९० हजार मतांनी निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांचा लाखभर मतांनी पराभव कसा काय झाला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत निवडणूक आयोगाच्या भेटीला गेलेल्या राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी राज ठाकरे यांन २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, आठ वेळा ८० ते ९० हजार मतांनी निवडून आलेल्या बाळासाहेब थोरात यांचा लाखभर मतांनी पराभव कसा काय झाला? हे कसं शक्य आहे. राज ठाकरे यांच्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र आता राज ठाकरे यांनी केलेला हा दावा चुकीचा असल्याचं समोर आलं आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा शिवसेना शिंदे गटाचे नवखे उमेदवार अमोल खताळ यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना १ लाख १ हजार ८२६ मतं मिळाली होती. तर अमोल खताळ यांना १ लाख १२ हजार ३८६ मतं मिळाली होती. अशा प्रकारे अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा १० हजार ५६० मतांनी पराभव केला होता.
दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीसाठी विधानसभेचे निकाल धक्कादायक ठरले होते. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून ५० जागांचा टप्पाही ओलांडता आला नव्हता. तर मनसेला भोपळाही फोडता आला नव्हता.