तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 07:51 IST2026-01-03T07:51:02+5:302026-01-03T07:51:32+5:30
भाजपचे सर्वाधिक १४ नगरसेवक डोंबिवलीतून बिनविरोध जिंकले...

तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
मुंबई : राज्यातील विविध महापालिकांमध्ये तब्बल ७० नगरसेवक हे बिनविरोध निवडून गेले आहेत. आजवरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. महापालिकेच्या विजयाची ही आमच्यासाठी नांदी असल्याचे भाजपने म्हटले आहे.
भाजपचे सर्वाधिक १४ नगरसेवक हे कल्याण-डोंबिवलीत जिंकले. त्याचे श्रेय मुख्यत्वे डोंबिवलीचे आमदार असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या ठाण्यात शिंदेसेनेचे ७ जण बिनविरोध जिंकले.
पनवेलमध्ये ७ उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे येथे भाजपचे ६ उमेदवार बिनविरोध झाले आहेत. येथून भाजपचे नितीन पाटील सर्वप्रथम बिनविरोध नगरसेवकपदी निवड झाले आहेत.
आयोगाने घेतली दखल
इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणूक बिनविरोध करताना कोणाकडून दबाव आला होता का, आमिषे दाखविण्यात आली होती का याबाबतचे अहवाल आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मागविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक असे
महापालिका भाजप शिंदेसेना राष्ट्रवादी (अजित पवार) इस्लामिक पार्टी अपक्ष
पुणे २ ० ० ० ०
पिंपरी चिंचवड २ ० ० ० ०
पनवेल ६ ० ० ० १
ठाणे ० ७ ० ० ०
भिवंडी ६ ० ० ० ०
कल्याण-डोंबिवली १४ ६ ० ० ०
धुळे ४ ० ० ० ०
मालेगाव ० ० ० १ ०
जळगाव ६ ६ ० ० ०
अहिल्यानगर ३ ० २ ० ०
एकूण ४३ १९ २ १ १
गोळीबार अन् तुंबळ हाणामारी; भाजप उमेदवाराचा दीर झाला जखमी -
धुळे : अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी देवपूर परिसरात संघर्षाने हिंसक वळण घेतले. उमेदवारी मागे घेण्याच्या आणि ‘पॅनेल’ फोडण्याच्या वादातून प्रभाग ५ मध्ये भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) गटाच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, तसेच नेहरूनगर परिसरात झालेल्या गोळीबारात भाजप महिला उमेदवाराचे दीर उमेश उर्फ बंटी कांबळे गंभीर जखमी झाले. हाणामारीत राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष कैलास चौधरी हे जखमी झाले.
राष्ट्रवादी (अजित पवार)चे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या मातोश्री कमलबाई चौधरी उमेदवार आहेत. तेथून भाजपतर्फे संध्या सागर कदम-कांबळे या उमेदवार आहेत. या दोन्ही गटांत हाणामारी झाली. बंटी कांबळे यांच्या पोटात गोळी खोलवर गेली.