महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, KDMCमध्ये मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 06:30 IST2026-01-22T06:27:23+5:302026-01-22T06:30:20+5:30
भाजप महायुतीवर ठाम; अकोल्यात उद्धवसेना भाजपशी हात मिळवण्याच्या तयारीत, अमरावतीत सत्तेसाठी भाजप अन् काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

महापौरपदासाठी वाट्टेल ते..! महापालिकेत सत्तेचा ‘बाजार’, KDMCमध्ये मनसेचा शिंदेसेनेला पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी बुधवारी शिंदेसेनेने धक्कातंत्राचा वापर करत मनसेला सोबत घेतले. राष्ट्रवादी (शरद पवार)चा एक नगरसेवक देखील शिंदेसेनेच्या बाजूने आहे, तर उद्धवसेनेचे चारजण संपर्कात आहेत. अशाप्रकारे अभूतपूर्व ‘जोड-तोड’ राजकारणातून शिंदेसेना महापौरपदासाठी ६५ ची मॅजिक फिगर गाठण्याच्या तयारीत आहे.
कोकण विभागीय आयुक्तांकडे बुधवारी बसने एकत्र जाऊन शिंदेसेनेने ५३, तर मनसेने ५ नगरसेवकांचा गट स्थापन केला. स्थानिक पातळीवरील नेते स्थानिक निर्णय घेऊ शकतात, असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला.
भाजपचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी सांगितले की, मनसेने महायुतीला पाठिंबा दिला असून युतीचा महापौर होणार हे ठरले आहे, त्यामुळे कुणालाही काळजीचे कारण नाही.
उद्धवसेनेच्या त्या चौघांची भूमिका ठरणार महत्त्वाची
उद्धवसेनेचे नॉट रिचेबल दोन आणि मनसेच्या गोटात गेलेले दोन नगरसेवक अजून कोणत्याही गटात गेलेले नाहीत. ६५ चे संख्याबळ गाठण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. हे चौघेही शिंदेसेनेच्या संपर्कात आहेत.
आम्ही युतीमध्येच सत्ता स्थापन करणार. आम्ही भाजपला कुठेही बाजूला ठेवत नाही. मनसे, भाजप व आम्ही मिळून सत्ता स्थापन करू. मनसे महायुतीमध्ये आल्याने ताकद वाढणार आहे..
-खा. डॉ. श्रीकांत शिंदे, शिंदेसेना
नागरिकांची कामे करायची असतील तर विरोधी बाकावर बसून होणार नाही. त्यामुळे शिंदेसेनेला पाठिंबा दिला.
-राजू पाटील, मनसे नेते
ठाकरे बंधूंमध्ये दिसतोय विसंवाद
एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीसाठीच्या युतीची घोषणा केली. मात्र, आता कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेनेच्या दोन नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला. तर, महापौरपदासाठी शिंदेसेनेला राज यांच्या मनसेने जाहीर पाठिंबा दिला. यामुळे ठाकरे बंधूंची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आणखी वृत्त/आपला महाराष्ट्र
शिंदेंचे नगरसेवक पुन्हा पंचतारांकित हॉटेलमध्ये?
महापालिका निवडणूक निकालानंतर्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील त्यांच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. नंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. मात्र महापौर निवडीच्या एक-दोन दिवस आधी पुन्हा ते नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचे समजते. नगरसेवक कोणाच्या गळाला लागू नयेत याची खबरदारी आणि भाजपवर दबावतंत्र अशी त्यांची दुहेरी रणनीती असल्याचे म्हटले जाते.
भविष्यात काहीही होऊ शकते
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोक आघाडी युती करतात. मनसे नेते राजू पाटील यांनीही अंतर्गत ॲडजस्टमेंट केली असावी. राजकारणात कधी काहीही होऊ शकते. कोणीही मित्र-शत्रू नसतो, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी दिला.
... तर अकोल्यात उद्धवसेना जाणार भाजपसोबत
उद्धवसेनेने तयार केलेल्या शहर विकासाच्या प्रस्तावावर भाजप तयार असेल तर त्यांच्यासोबत जाण्याची तयारी आहे, असे उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केले. प्रस्ताव मान्य न झाल्यास काँग्रेससोबतही जाऊ, असेही त्यांनी नमूद केले. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपविरोधी पक्ष एकत्र आल्यास काँग्रेसला कुठलेही पद नको. भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करावी, असे आवाहन काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी केले. सोबतच सर्व पक्षांशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोल्यात भाजपकडे आहेत ३८ नगरसेवक
- भाजपकडे ३८ नगरसेवक आहेत. सत्तास्थापनेसाठी एकूण ४१ नगसेवकांची संख्या गरजेची आहे. तर काँग्रेस-२१, उद्धवसेना-६, राष्ट्रवादी (शरद पवार)-३, वंचित बहुजन आघाडी-५, एमआयएमचे तीन मिळून ३८ नगरसेवक होत आहेत.
- त्यांच्यासोबत एक अपक्ष, महानगर विकास समितीचा एक, शिंदेसेना -१ नगरसेवक एकत्र आल्यास त्यांची संख्याही ४१ होते. त्यामुळे भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे.
अमरावतीत मॅजिक फिगर गाठण्यासाठी जुळवाजुळव
- ८७ सदस्यीय अमरावती महापालिकेत बहुमतासाठी ४४ सदस्यसंख्येची गरज आहे. मात्र तो आकडा कुणालाही स्वबळावर गाठता आलेला नाही. त्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेल्या २५ सदस्यीय भाजपला युवा स्वाभिमान (१५) ची गरज आहे.
- शिंदेसेनेच्या ३ सदस्यांचा पाठिंबा गृहित धरला तरी संख्या ४३ वर पोहोचते. तर १५ सदस्य असलेल्या काँग्रेसनेही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, बसप ३, उद्धवसेना २, वंचित १ मिळून ती संख्या ४४ वर पोहोचते.