AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:58 IST2026-01-07T17:56:03+5:302026-01-07T17:58:37+5:30
या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना नोटीस बजावली आहे

AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
मुंबई - राज्यात २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच भाजपाने अकोटमध्ये एमआयएमसोबत युती करून सत्ता स्थापन केल्याची बातमी सगळीकडे धडकली. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने एमआयएमची साथ घेतली हे चित्र राज्यासमोर उभे राहिले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीवर चहुबाजूने टीका होऊ लागली. या प्रकाराची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एमआयएमसोबत युतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्थानिक नेत्यांना फटकारले.
आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना नोटीस बजावली आहे. त्यात म्हटलंय की, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये आपण अकोट नगरपरिषदेत AIMIM सोबत युती करून भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला आहे. तसेच हे करत असताना कोणालाही विश्वासात न घेता आपल्या या कृतीतून पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत आपण तातडीने खुलासा करावा असं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बजावले आहे.
नेमकं काय घडलं?
अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपाला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले. मात्र, सभागृहात स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपाने सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली. यात भाजपाने इतर पक्षांसोबत एमआयएमच्या ५ सदस्यांचाही समावेश केला. या नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही करण्यात आली. मात्र एमआयएमसोबत हातमिळवणी करत भाजपाच्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न' राज्यभरात चर्चेत आला. त्यामुळे भाजपावर विरोधकांनी तोंडसुख घेतले.
या प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांना फटकारले. काँग्रेस आणि एमआयएमसोबत भाजपाची युती कधीच होऊ शकत नाही, हा प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांचे कान टोचले. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रकाश भारसाखळे यांना नोटीस पाठवली आहे.