अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:06 IST2025-12-29T11:05:55+5:302025-12-29T11:06:45+5:30
Ajit Pawar, Sharad Pawar Pune news: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते उपस्थित आहेत.

अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
पुणे: पुणेकरांच्या आणि राज्याच्या नजरा आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे लागल्या होत्या. निमित्त होतं, शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांच्या संभाव्य भेटीचं. मात्र, ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आज शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. या बैठकीला हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील यांसारखे नेते उपस्थित आहेत. या सभेला अजित पवार देखील उपस्थित राहणार होते, मात्र बैठकीला सुरुवात झाली तरी दादा गैरहजरच राहिले.
अनुपस्थितीचे कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) एक महत्त्वाची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या रणनितीसाठी अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातलेले असल्याने त्यांनी शुगर इन्स्टिट्यूटच्या सभेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राजकीय अर्थ आणि संकेत
पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या हालचाली सुरु होत्या. परंतू, दोन्ही गटांतील बोलणी फिस्कटली होती. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच वर्षाच्या अखेरीस काका-पुतणे एकाच मंचावर येतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, अजित पवारांनी 'सहकार' क्षेत्रातील बैठकीपेक्षा 'निवडणुकीच्या' राजकारणाला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.