हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 06:10 IST2024-12-08T06:09:54+5:302024-12-08T06:10:27+5:30
काही आकडेवारी देऊन फडणवीस यांनी पराभव स्वीकारण्याचे आवाहन पवार यांना केले. तसेच पवार यांनी सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

हार मान्य करा, सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्या; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांकडून अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. काही आकडेवारी देऊन फडणवीस यांनी पराभव स्वीकारण्याचे आवाहन पवार यांना केले. तसेच पवार यांनी सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
फडणवीस यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली. त्यात म्हटले आहे की, शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मते मिळूनही कमी जागा कशा? असे आपण म्हणता तर मग चला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय झाले ते पाहू. भाजपाला १ कोटी ४९ लाख १३ हजार ९१४ मते मिळाली पण नऊ जागा मिळाल्या. काँग्रेसला ९४ लाख ४१ हजार ८५६ मते मिळूनही १३ जागा मिळाल्या.
कुणाला किती मते आणि किती विजय?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ७३ लाख ७७ हजार ६७४ मते मिळाली आणि सात जागा त्यांनी जिंकल्या. शरद पवार गटाला ५८ लाख ५१ हजार १६६ मते मिळाली पण त्यांनी ८ जागा जिंकल्या. २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७ लाख ९२ हजार २३७ मते मिळाली पण एकच जागा जिंकता आली होती. तत्कालीन राष्ट्रवादीला ८३ लाख ८७ हजार ३६३ मते मिळाली आणि चार जागा जिंकता आल्या होत्या याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.