Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:52 IST2026-01-14T15:44:25+5:302026-01-14T15:52:55+5:30
Who is Syeda Falak: सोलापूरच्या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान देणाऱ्या सईदा फलक यांच्या एका विधानाने सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. "एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला देशाची पंतप्रधान होईल," असं म्हणत त्यांनी राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली.

Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एमआयएमच्या फायरब्रँड नेत्या सईदा फलक सध्या आपल्या आक्रमक भाषणांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देत आहेत. सोलापूर येथील एका सभेत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिल्याने सध्या सोशल मीडियापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे.
सोलापूरच्या भव्य रॅलीत बोलताना सईदा फलक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, "ऐका फडणवीस, जर देवाची इच्छा असेल तर एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल. हा देश कोणाची खासगी मालमत्ता नाही." त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून, एमआयएममध्ये असदुद्दीन ओवैसींनंतरच्या त्या सर्वात प्रभावशाली वक्त्या मानल्या जात आहेत.
कोण आहे सईदा फलक?
सईदा फलक यांची ओळख केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. ३१ वर्षीय सईदा या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कराटे चॅम्पियन आहेत. खेळाच्या मैदानात त्यांना 'फलक द फायटर' म्हणून ओळखले जाते. त्यांच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. त्यांनी आतापर्यंत २० हून अधिक राष्ट्रीय आणि २२ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके जिंकून भारताचा तिरंगा जगभरात फडकवला आहे. जागतिक आणि आशियाई कराटे चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरणारी आणि राष्ट्रकुल कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी त्या तेलंगणातील पहिली महिला खेळाडू आहेत. सईदा या पेशाने वकील असून त्या स्वतःची कराटे अकादमीही चालवतात, जिथे तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात.
सईदा फलक यांचा राजकीय प्रवास
२०२० मध्ये सईदा फलक यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील 'एआयएमआयएम' पक्षात प्रवेश केला. अत्यंत स्पष्टवक्ती शैली आणि संविधानाच्या चौकटीत राहून मांडलेली मते यामुळे त्या तरुणांमध्ये आणि विशेषतः महिलांमध्ये लोकप्रिय होत आहेत. अल्पसंख्याक समुदायाचे प्रश्न आणि महिलांचे हक्क यावर त्या प्रखरपणे भाष्य करतात.
महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला
सध्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सईदा फलक यांच्या सभांना हजारो लोकांची गर्दी होत आहे. रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना चितपट करण्याचे कौशल्य असलेल्या सईदा आता राजकीय आखाड्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण त्यांच्या एका विधानाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापवले आहे.