२६ पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित; BJPची गटबाजीवर करडी नजर, बंडखोर-असंतुष्टांवर ‘स्पेशल वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 09:56 IST2026-01-10T09:52:11+5:302026-01-10T09:56:43+5:30
भाजपने बंडखोरीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांवर ‘स्पेशल वॉच’ आणि बंडखोर कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पक्षाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

२६ पदाधिकारी ६ वर्षांसाठी निलंबित; BJPची गटबाजीवर करडी नजर, बंडखोर-असंतुष्टांवर ‘स्पेशल वॉच’
मुंबई: भाजपने बंडखोरीविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पालिका निवडणुकीसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना सहकार्य न केल्याने काही माजी नगरसेवकांसह २६ पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी हा निलंबन आदेश जारी केला आहे.
पक्षाने वारंवार विनंती करूनही संबंधित पदाधिकारी महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य करीत नसल्याने ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचे साटम यांनी स्पष्ट केले आहे. निलंबितांमध्ये वॉर्ड क्रमांक ६० (वर्सोवा) येथील दिव्या ढोले, वॉर्ड १७७ (माटुंगा) येथील नेहल शहा, वॉर्ड २०५ (अभ्युदय नगर) येथील जान्हवी राणे आणि वॉर्ड १३ (बोरिवली) येथील आसावरी पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या इतरही अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
काही भाजप नेत्यांनी ही कारवाई उशिरा झाल्याची म्हटले आहे. गेल्या आठवड्यात पक्षाने काही बंडखोरांना माघार घेण्यात यश मिळविले. वॉर्ड १ मधून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेल्या सुनीता यादव, प्रभाग २०० मधून गजेंद्र धुमाळे यांनी उमेदवारी मागे घेतली, तर वॉर्ड २२१ मध्ये माजी नगरसेवक जनक संघवी यांनी माघार घेतल्याने आकाश पुरोहित हे अधिकृत भाजप उमेदवार राहिले आहेत.
जिथे गटबाजी तिथे भाजपची राहणार करडी नजर....
- भाजप अंतर्गत जिथे मोठ्या प्रमणात गटबाजी आहे तिथे नजर ठेवण्यासाठी प्रदेश भाजपने समांतर यंत्रणा राबविली असल्याची माहिती आहे. काही विशिष्ट कार्यकर्ते, नेते यांना त्यासाठी विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. त्यापैकी काहीजण हे त्या-त्या शहरातील आहेत तर काही बाहेरचे आहेत.
- सोलापूर, अमरावती, चंद्रपूर आदी शहरांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. सोलापूरमध्ये पूर्वी आ. सुभाष देशमुख आणि आ. विजय देशमुख यांच्यात संघर्ष होता पण आता तो नसला तरी बाहेरून आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. सचिन कल्याणशेट्टी विरुद्ध देशमुख आमदारद्वय असे काहीसे चित्र दिसते. तेथेही वरून ‘वॉच’ ठेवला जात आहे.
- अमरावतीमध्ये भाजप आणि आ. रवी राणा यांच्या पक्षाची युती असली तरी काही जागांवर दोन पक्षांत लढतही होत आहे. या परिस्थितीत माजी खा. नवनीत राणा यांच्या भूमिकेवर वरून लक्ष ठेवले जात असल्याचे कळते. कोण, कुठे आणि कशी गडबड करत आहे याचे रिपोर्ट्स रोज रात्री वर पोहोचतात म्हणे!
दरम्यान, चंद्रपूर येथील भाजपच्या बंडखोर कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पक्षाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात रोड शोमध्ये एका बाजूला आ. सुधीर मुनगंटीवार, तर दुसऱ्या बाजूला आ. किशोर जोरगेवार दिसून आले. संपूर्ण प्रवासात या दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले, त्यामुळे सूर बिघडल्याची कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरू आहे.
- महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सभांमध्येही तिकीट न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या पार्श्वभूमीवर भाजपने बंडखोर व असंतुष्ट कार्यकर्त्यांवर ‘स्पेशल वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.