Ulhasnagar: उल्हासनगरात गुन्हेगारांना उमेदवारी; कुणावर अपहरण तर, कुणावर खुनाचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:47 IST2026-01-06T18:45:27+5:302026-01-06T18:47:08+5:30
Ulhasnagar Municipal Corporation Election: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उमेदवारांवरील गुन्हेगारी खटल्यांची चर्चा रंगली आहे.

Ulhasnagar: उल्हासनगरात गुन्हेगारांना उमेदवारी; कुणावर अपहरण तर, कुणावर खुनाचे गंभीर आरोप
एकेकाळी मंगळवार आणि शुक्रवारच्या 'खूनसत्रा'साठी कुप्रसिद्ध असलेल्या उल्हासनगरचा गुन्हेगारी आणि राजकारण यांचा संबंध जुनाच आहे. पप्पू कलानी जेलमध्ये असताना दोन वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास असलेल्या या शहरात, आगामी निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उमेदवारांवरील गुन्हेगारी खटल्यांची चर्चा रंगली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक दिग्गज उमेदवारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, काही महिला उमेदवारांच्या पतींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीनेही मतदारांचे लक्ष वेधले आहे.
राजेंद्र चौधरी यांच्यावर सर्वाधिक १६ गुन्हे
या निवडणुकीत शिंदेसेनेचे उमेदवार राजेंद्र चौधरी हे गुन्ह्यांच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये केवळ राजकीय आंदोलनातील गुन्हेच नाहीत, तर इतर गंभीर कलमांचाही समावेश आहे. चौधरी यांनी मात्र हे गुन्हे राजकीय संघर्षातून दाखल झाल्याचे सांगितले आहे.
भाजप आणि इतर उमेदवारांची स्थिती
राजकीय मैदानात एकमेकांसमोर उभे असलेले उमेदवार गुन्ह्यांच्या बाबतीतही एकमेकांना तोड देताना दिसत आहेत:
धनंजय बोडारे (भाजप): ७ गुन्हे दाखल.
प्रधान पाटील: ७ गुन्हे दाखल.
आमदार कुमार आयलानी: स्वतः आमदारांपेक्षा त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर नेते: शिंदेसेनेचे अरुण अशान, चंद्रशेखर यादव, महेश सुखरामनी, दुर्गाप्रसाद राय आणि विजय पाटील यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
महिला उमेदवार आणि त्यांच्या पतींची 'दबंगगिरी'
निवडणूक रिंगणात असलेल्या महिला उमेदवारांवरील वैयक्तिक गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत अल्प असले, तरी त्यांच्या 'बॅकिंग'ला असलेल्या पतींच्या नावावर मात्र गुन्ह्यांची मोठी यादी आहे. आकडेवारीनुसार, सुमारे २० टक्के उमेदवार किंवा महिला उमेदवारांचे पती हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यांच्यावर अपहरण, चोरी, खून, हाणामारी आणि फसवणूक यांसारखे गंभीर आरोप आहेत.
इतिहास पुन्हा समोर
उल्हासनगरमध्ये राजकारण आणि गुन्हेगारीचे समीकरण नवीन नाही. पप्पू कलानी यांचे जेलमधून निवडून येणे हे या शहराच्या राजकीय मानसिकतेचे एक उदाहरण मानले जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदारांसमोर विकास की 'दबंगगिरी', असा पेच निर्माण झाला आहे. २० टक्के उमेदवारांचे डागळलेले प्रतिज्ञापत्र पाहता, उल्हासनगरचे राजकारण अजूनही गुन्हेगारीच्या सावटातून पूर्णपणे बाहेर पडलेले नाही, हेच स्पष्ट होते.