महाराष्ट्र-मध्य प्रदेश संयुक्तरीत्या राबविणार जगातील सर्वांत मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 06:37 IST2025-03-02T06:36:32+5:302025-03-02T06:37:36+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ही माहिती दिली.

महाराष्ट्र-मध्य प्रदेश संयुक्तरीत्या राबविणार जगातील सर्वांत मोठा ग्राउंडवॉटर रिचार्ज प्रकल्प
अनुराग श्रीवास्तव, लोकमत न्यूज नेटवर्क, भोपाळ : मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही दोन राज्ये मिळून तापी खोऱ्यातील मेगा रिचार्ज योजना संयुक्तरीत्या कार्यान्वित करणार आहेत. ही जगातील सर्वांत मोठी ग्राउंडवॉटर रिचार्ज योजना असून त्यासाठी दोन्ही राज्यांतील सरकारांमध्ये समझोता करार (एमओयू) होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ही माहिती दिली.
मुख्यमंत्री यादव यांनी सांगितले की, या योजनेचा फायदा मध्य प्रदेशच्या दोन व महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना होऊन भूजलाच्या पातळीत वाढ होईल. या योजनेला कोणाचाही विरोध नसून केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या योजनेबाबतच्या एमओयूवर स्वाक्षऱ्या केल्या जातील.
विदर्भाशी संबंधित भागांमध्ये औद्योगिक कॉरिडोर
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या विदर्भातील घनिष्ठ संबंधांवर चर्चा केली. त्यांनी सुचवले की, मध्य प्रदेश आणि विदर्भातील संबंधित भागांच्या समावेशासह नवीन औद्योगिक कॉरिडोर विकसित केला जाऊ शकतो. यावर मुख्यमंत्री यादव यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे फलित उत्साहवर्धक
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, भोपाळमध्ये नुकतीच ग्लोबल इन्व्हेस्टर समिट आयोजिण्यात आली होती. त्याचे फलित उत्साह वाढविणारे आहे. या समिटचे नियोजन करण्यापूर्वी प्रादेशिक स्तरावरही औद्योगिक संमेलनांचे आयोजन करून गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते.
सरकार फक्त आलेल्या गुंतवणूक प्रस्तावांपर्यंतच मर्यादित राहणार नाही, तर १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक प्रस्तावांचाही पाठपुरावा केला जाईल. त्याबाबतची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सरकारचे अधिकारी राज्यातील गुंतवणूकदारांशी सतत संपर्कात राहून उद्दिष्ट पूर्ण करतील. ग्लोबल इन्व्हेस्टर समिटपूर्वी मध्य प्रदेश सरकारने विभागवार परिषदांचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे अनावरण करणार
स्वातंत्र्यसेनानी आणि लोकमत समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे जबलपूर येथील व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये अनावरण करण्यास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सहमती दिली. लवकरच मुख्यमंत्री या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यादव यांच्याशी झालेल्या भेटीत डॉ. विजय दर्डा यांनी स्वलिखित पुस्तके भेट दिली.