पुसून टाकण्याची भाषा कशाला? ज्याने त्याने भूमिका मांडावी; अजित पवार यांचे खडेबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:40 IST2026-01-10T16:39:40+5:302026-01-10T16:40:27+5:30
महाराष्ट्राला सुसंस्कृत परंपरा आहे. महापुरुषांची शिकवण आहे.

पुसून टाकण्याची भाषा कशाला? ज्याने त्याने भूमिका मांडावी; अजित पवार यांचे खडेबोल
लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या शहराचे सुपुत्र विलासराव देशमुख यांचे योगदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा सुसंस्कृत वारसा त्यांनी चालवला होता. त्यांची आठवण पुसून टाकण्याची भाषा योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपली पक्षीय भूमिका मांडावी, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे खडेबोल सुनावले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, अँड. बळवंत जाधव, अँड. व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा अनादर महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आपले आहे, असेही ते म्हणाले.
भावनिक मुद्दा करून चालणार नाही
महाराष्ट्राला सुसंस्कृत परंपरा आहे. महापुरुषांची शिकवण आहे. या शिकवणीमुळे महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी कधीही तणाव निर्माण होऊ दिला नाही. आठवण पुसून टाकण्याचे त्यांचे विधान चुकीचे आहे. शिवाय भावनिक मुद्दा उपस्थित करून चालणार नाही, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.