Latur Municipal Election 2026: लातूर महापालिकेचे तिकीट कुणाला? इच्छुकांच्या गर्दीने भाजप-काँग्रेसच्या चाणक्यांची कसोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:50 IST2025-12-29T16:47:01+5:302025-12-29T16:50:01+5:30
Latur Mahanagarpalika Election 2026 इच्छुकांची तुंबळ गर्दी : प्रभाग १२ आणि १३ मध्ये उमेदवारीचा ‘जाम’; एका जागासाठी १५ जणांची स्पर्धा

Latur Municipal Election 2026: लातूर महापालिकेचे तिकीट कुणाला? इच्छुकांच्या गर्दीने भाजप-काँग्रेसच्या चाणक्यांची कसोटी!
लातूर : लातूर महानगरपालिकेच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत आहे, तसतशी राजकीय गोटात कमालीची हालचाल वाढली असून, विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे इच्छुकांनी तिकिटासाठी मोठी गर्दी केली आहे.
शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. या प्रभागातून एकूण चार नगरसेवक निवडून द्यायचे असून, आरक्षण सोडतीनुसार अनुसूचित जाती (पुरुष) १ जागा, ओबीसी (महिला) १ जागा, खुला प्रवर्ग (महिला) १ आणि खुला (पुरुष) १ जागा आहे. असे एकूण चार नगरसेवक या प्रभागातून निवडून द्यायचे आहेत. तिकीट मागण्यासाठी सर्वात जास्त चुरस अनुसूचित जातीच्या जागेसाठी दिसून येत आहे. या एका जागेसाठी काँग्रेसकडून १५ इच्छुकांनी आपली दावेदारी सादर केली आहे, तर भाजपमध्येही साधारण १५ जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामानाने ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातून काँग्रेसकडून प्रत्येकी ४ ते ५, तर भाजपकडून ६ इच्छुकांनी तिकीटासाठी मागणी केली आहे.
प्रभाग १२ मध्येही इच्छुकांचा भरणा !
प्रभाग क्रमांक १२ ची स्थितीही वेगळी नाही. येथेही चार जागांसाठी मतदान होणार असून, त्यापैकी एक जागा अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रभागातही भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच कसोटी लागणार आहे.
पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवारीचे मोठे आव्हान..!
दोन्ही प्रभागांमधील आकडेवारी पाहिली तर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या इतर प्रवर्गांच्या तुलनेत अधिक आहे. एका जागेसाठी अनेक प्रबळ दावेदार असल्याने कोणाला संधी द्यायची आणि नाराजांची समजूत कशी काढायची, हे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान असणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत कोणाच्या नशिबाचे कुलूप उघडते आणि पक्ष कोणावर विश्वास दाखवतात, याकडे आता संपूर्ण लातूरकरांचे लक्ष लागले आहे.
तिकीट मिळवण्यासाठी चुरस..!
लातूर शहरातील सर्वच १८ प्रभागांत तिकीट मिळवण्यासाठी मोठी चुरस आहे. विशेषतः भाजप आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांकडे इच्छुकांचा ओढा सर्वाधिक आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या १२ जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी तिकीटाची मागणी केली आहे.