कैद्यांना निवडणूक लढता येते मात्र, मतदानाचा अधिकार नाही; जामिनावर, तडीपार आरोपींचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:22 IST2026-01-14T19:17:45+5:302026-01-14T19:22:16+5:30
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबाबत निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत.

कैद्यांना निवडणूक लढता येते मात्र, मतदानाचा अधिकार नाही; जामिनावर, तडीपार आरोपींचे काय?
लातूर : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदानाचा हक्क कोणाला आहे अन् कोणाला नाही, याबाबतचे काही कायदेशीर निकष आहेत. विशेषतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबाबत निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत. कैद्यांना निवडणूक लढवता येते, मात्र मतदानाचा अधिकारी नाही.
तडीपार आरोपी अन् स्थानबद्धांसाठी नियम...
ज्या आरोपींना विशिष्ट जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे, त्यांना मतदानाच्या दिवशी दिलासा मिळतो. ज्या मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, तिथे ठराविक कालमर्यादेत येऊन मतदान करण्याची मुभा त्यांना दिली जाते. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना तत्काळ जिल्हा सोडावा लागतो. दुसरीकडे, जे आरोपी स्थानबद्ध आहेत, त्यांना निवडणूक आयोगाच्या परवानगीने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
कैद्यांबाबत काय सांगतो कायदा?
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ६२(५) नुसार, जे आरोपी प्रत्यक्ष तुरुंगात (शिक्षा भोगत असलेले किंवा कच्च्या कैद्यांच्या स्वरूपात) आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. मात्र, यात एक मोठा विरोधाभास दिसून येतो.निवडणूक लढवता येते, पण मतदान करता येत नाही.
लातूर कारागृहामध्ये ४२५ बंदिवान संख्या...
लातूर जिल्हा कारागृहाची क्षमता ५०० कैद्यांची आहे. सध्याला ४२५ कैदी आहेत. यामध्ये १९ महिला कैदी तर ४०६ पुरुष कैदी आहेत. यामध्ये ५० कैदी हे शिक्षा भाेगत आहेत.
- बी.एन. मुलाणी, तुरुंग अधीक्षक, लातूर
‘जामिना’वर असेल तर करता येईल मतदान...
भारतीय कायद्यानुसार, एखादी व्यक्ती तुरुंगात असतानाही निवडणूक लढवू शकते. (जोपर्यंत तिला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ शिक्षा होऊन अपात्र ठरवले जात नाही). मात्र, तीच व्यक्ती तुरुंगात असताना स्वतःचे मत देऊ शकत नाही. हा नियम जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना लागू होत नाही; ते मतदान करू शकतात.
तर तुरुंगातील कैद्यांना मतदान करता येत नाही...
पाेलिसांकडून तडीपार आणि स्थानबद्ध केलेल्या व्यक्ती लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. मात्र तुरुंगात असलेल्या कैद्यांसाठी मतदानाचा दरवाजा अद्याप बंद आहे.