लातूरमध्ये राजकारण तापले; काँग्रेस, भाजपमध्ये आयाराम विरुद्ध निष्ठावंत संघर्ष वाढणार
By आशपाक पठाण | Updated: December 29, 2025 14:00 IST2025-12-29T13:59:26+5:302025-12-29T14:00:14+5:30
पक्षनिष्ठा जपणारे नेते एकीकडे ठाम भूमिका घेत असताना, दुसरीकडे संधी पाहून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

लातूरमध्ये राजकारण तापले; काँग्रेस, भाजपमध्ये आयाराम विरुद्ध निष्ठावंत संघर्ष वाढणार
लातूर : लातूर महापालिकेच्या निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. आयाराम नेते आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील संघर्ष उघडपणे समोर येत असून, भाजप, काँग्रेस नेत्यांच्या दारात इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, असा प्रश्न नेत्यांसमोर मांडला जात आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. अद्याप यादी निश्चित नाही. पक्षांतरामुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
महापालिकेतील सत्तासमीकरणे बदलणार की कायम राहणार, यावर अनेकज तर्कवितर्क लढवित आहेत. काही नगरसेवक व इच्छुकांनी आपली दिशा बदलण्यास सुरुवात केली आहे. पक्षनिष्ठा जपणारे नेते एकीकडे ठाम भूमिका घेत असताना, दुसरीकडे संधी पाहून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांत अंतर्गत नाराजी आणि गटबाजी वाढली आहे. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात महायुती होणार की नाही, यावर केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. रविवारी दिवसभर भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या घरी बैठका झाल्या. सायंकाळी भाजपचे निवडणूक प्रमुख माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत राष्ट्रवादीची बैठक झाली. तिढा सुटत नसल्याने अकेला चलो ची भूमिका राष्ट्रवादी घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप, काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी...
विशेष म्हणजे, काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची परिस्थिती सध्या जवळपास समान असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दोन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या मोठी असून, नेतृत्वाबाबत संभ्रम, अंतर्गत मतभेद आणि सत्तेच्या गणितामुळे निर्णयप्रक्रिया अडचणीत आली आहे. भाजपच्या निष्ठावंत नेत्याकडे रोज भेटीसाठी होणारी गर्दी ही पक्षातील अस्वस्थतेचे आणि आगामी घडामोडींचे संकेत देत आहे.रविवारचा दिवस उमेदवारी याद्यावर अंतिम हात फिरविण्यासाठीच गेला आहे. प्रमुख दावेदार अन् नेत्यांच्या बैठकांमध्ये घडलेल्या घटनांवर सर्वच कार्यकर्ते कान देऊन आहेत.
रविवारी दिवसभर बैठकांचे सत्र...
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बाभळगाव येथे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या निवासस्थानी गर्दी होती. तर रात्री उशिरापर्यंत एकमेकांसमोरील उमेदवार यावर मंथन करीत याद्या निश्चित करण्याचे काम केले जात आहे. महापालिकेवर आजवर प्राबल्य असलेली काँग्रेस कोणाला सोबत घेणार की स्वबळावर लढणार हे मंगळवारी स्पष्ट होईल्. तुर्तास मात्र, मतदारांच्या गाठी-भेटी वाढल्या आहेत.
बंडखोरी रोखण्यासाठी शक्कल...
जागा एक दावेदार चार ते पाच अशी स्थिती भाजप, काँग्रेस दोन्ही पक्षात आहे. यातून जिंकून येण्याची क्षमता, संपर्क आदी गणिते मांडली जात आहेत. यादी जाहीर केल्यावर बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याने दोन्ही पक्षाकडून सर्वांनाच खूश ठेवण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत राहणार असल्याचे चित्र आहे.