Maharashtra Election 2019: BJP Amit Shah Slams NCP Sharad Pawar In latur Rally | Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या तीन पटीने देवेंद्र फडणवीस सरकारचे काम; अमित शहांचा शरद पवारांना टोला
Maharashtra Election 2019: शरद पवारांच्या तीन पटीने देवेंद्र फडणवीस सरकारचे काम; अमित शहांचा शरद पवारांना टोला

तुळजापूर: भाजपा सरकारने केलेली विकासकामे विरोधकांच्या ५० वर्षे राजवटीपेक्षाही सरस आहेत. शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते, त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले. त्यांच्यापेक्षा तीन पट कामे देवेंद्र फडणवीस सरकारने करून दाखविली. तुम्ही फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बदलत राहिलात, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी प्रचारसभेत लगावला.

भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री शहा यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर व लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे सभा झाली. यावेळी ते म्हणाले, काँग्रेसचे लोक देश एकसंघ ठेवू शकत नाहीत. त्यांनी १५ वर्षे भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला. त्यामुळे ते विकासाच्या मुद्यावर आमच्यासमोर टिकू शकत नाहीत. भाजपा सरकारने मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड योजनेला मंजुरी दिली.  राज्यातील पहिली रेल्वे कोच फॅक्टरी लातूरला होत आहे. एकट्या लातूर जिल्ह्यात २ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये मदत मिळाली आहे. ३३ हजार वीज कनेक्शन, ४२ हजार गॅस कनेक्शन दिले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकांना मिळाला. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीकडे विरोधाला मुद्दाच नाही.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी पराभवानंतर परदेश दौरे करीत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीत घराणेशाहीचा जयघोष आहे. अजित पवार जलसंपदा मंत्री होते, त्यांनी पाण्याचा एक थेंबही शेतकºयांना मिळेल असे काम केलेले नाही. आम्ही ९ हजार कोटी खर्चून १८ हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविली. काँग्रेस आघाडीत मात्र भ्रष्टाचार शिष्टाचार झाला. त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पाच वर्षे टिकले नाहीत. आम्ही पाच वर्षे सक्षम आणि भ्रष्टाचारमुक्त नेतृत्व दिले.

इंदिरा गांधी यांच्या युद्धाच्या निर्णयाचे जनसंघाने स्वागत केले होते याची आठवण करून देत गृहमंत्री शहा म्हणाले, कलम ३७०, सर्जिकल स्ट्राईक आम्ही केले. मात्र राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. ३७० वर काँग्रेस सहमत आहे की नाही, हे त्यांनी स्पष्ट करावे. ३७० हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्याचे काम केले आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राफेलच्या पूजेवरून सुरू झालेल्या टिकेला उत्तर देताना अमित शहा म्हणाले, दसºयाला आपण शस्त्रांचे पूजन करतो. राफेल हे आपले शस्त्र आहे, त्याचे पूजन केले तर बिघडले काय. मंचावर निलंग्याचे उमेदवार पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर शृंगारे, खा. ओमराजे निंबाळकर, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, औश्याचे उमेदवार अभिमन्यू पवार, आ. सुधाकर भालेराव उपस्थित होते.

चून चूनकर बाहर निकालेंगे...

काँग्रेस नेहमीच देशहिताच्या गोष्टींना विरोध करते. पण एकदा का एनआरसी लागू झाली की, मग या देशात अनधिकृतपणे राहणाºयांना ‘हम चून चूनकर बाहर निकालेंगे’ असा इशाराही अमित शहा यांनी यावेळी दिला.

Web Title: Maharashtra Election 2019: BJP Amit Shah Slams NCP Sharad Pawar In latur Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.