'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:32 IST2026-01-07T14:31:45+5:302026-01-07T14:32:28+5:30
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर: मोठ्या पगाराची स्वप्नं सोडून वस्तीच्या विकासाचा ध्यास

'लंडन रिटर्न' ऐश्वर्या चिकटे निवडणुकीच्या रिंगणात; लातूरच्या विकासासाठी मांडला 'ग्लोबल' प्लॅन!
लातूर : राजकारणात उच्चशिक्षित तरुणांनी यावे, अशी चर्चा नेहमीच होते. पण, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एका अशा उमेदवाराने शड्डू ठोकला आहे, जिच्या शिक्षणाची चर्चा आता संपूर्ण शहरात होत आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेली ऐश्वर्या सुशीलकुमार चिकटे ही तरुणी आता लातूरच्या विकासासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
लातूर शहराच्या पूर्व भागातील बौद्ध नगरची रहिवासी असलेल्या ऐश्वर्याने 'मास्टर इन इकॉनॉमिक हिस्टरी' या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. परदेशातील मोठ्या पगाराच्या संधी सोडून तिने आपल्या मातीतील प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन सेनेची संयुक्त उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.
ऐश्वर्या चिकटे यांचे व्हिजन काय..?
ऐश्वर्या केवळ निवडणूक लढवत नाही, तर ती एक स्पष्ट व्हिजन घेऊन मतदारांसमोर जात आहे. लातूरचा पॅटर्न केवळ अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणापुरता मर्यादित न राहता, तो अधिक व्यापक झाला पाहिजे, अशी तिची ठाम भूमिका आहे. झोपडपट्टी आणि स्लम भागात सामान्यांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी, यासाठी 'मोहल्ला क्लिनिक' सुरू करण्याचा तिचा मानस आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगाराच्या संधी आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती आग्रही आहे.
आता मानसिकता बदलायला हवी
आपल्या प्रचारादरम्यान ऐश्वर्या मतदारांना एक महत्त्वाचे आवाहन करत आहे. ती म्हणते, प्रत्येक वेळी त्याच त्याच पक्षांना आणि जुन्याच चेहऱ्यांना सत्तेत बसवण्याची मानसिकता आता मतदारांनी बदलायला हवी. नव्या विचारांच्या आणि उच्चशिक्षित तरुणांच्या हाती सत्तेची चावी दिली, तरच शहराचा कायापालट होईल. लातूरच्या राजकारणात एका उच्चविद्यविभूषित तरुणीच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक आता उत्सुकतेची ठरली आहे. प्रभागातील मतदार या 'लंडन रिटर्न' उमेदवाराला कशी साथ देतात, हे पाहणे महत्त्वाचे आणि उत्सुकतेचे ठरेल.