लातूरमध्ये भाजपाच्या १८ बंडखोरांना दणका; सहा वर्षांसाठी निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:37 IST2026-01-12T12:37:19+5:302026-01-12T12:37:37+5:30
शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची माहिती

लातूरमध्ये भाजपाच्या १८ बंडखोरांना दणका; सहा वर्षांसाठी निलंबन
लातूर : पक्षशिस्तीचा भंग करून संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने पक्षातील १८ जणांना भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी रविवारी दिली.
लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षशिस्त, धोरणे व निर्णय यांचे पालन होणे अपेक्षित होते. या संदर्भात पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर १८ जणांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्यकर्ते जी पदे भूषवित होते ती पदेही समाप्त केली जात असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.
संगीत रंदाळे, गणेश हेड्डा, वल्लभ वावरे, श्रीनिवास लांडगे, पृथ्वीसिंह बायस, शिवसिंह शिसोदिया, विवेक साळुंके, श्रीकांत रांजणकर, वैभव वनारसे, विशाल हवा पाटील, अजय कोकाटे, किशोर कवडे, संदीप सोनवणे, अशोक ताकतोडे, दिलीप बेलूरकर, दीपक कांबळे, महेश झंवर, भरत भोसले आदींना निलंबित करण्यात आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.