लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर, तर स्नेहल उटगे उपमहापौरपदी बिनविरोध निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 14:14 IST2026-02-09T14:11:09+5:302026-02-09T14:14:19+5:30
वंचितच्या माघारीने पेच सुटला! लातूर महापालिकेत काँग्रेस-वंचित युतीची बिनविरोध सत्ता.

लातूर महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा; जयश्री सोनकांबळे महापौर, तर स्नेहल उटगे उपमहापौरपदी बिनविरोध निवड
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीचा पेच अखेर सुटला असून, काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे यांची महापौरपदी, तर ॲड. स्नेहल उटगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने शेवटच्या क्षणी आपले उमेदवार मागे घेतल्याने या निवडीचा मार्ग मोकळा झाला.
निवडीचा घटनाक्रम
सोमवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. पीठासन अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. सुरुवातीला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सत्तेच्या वाटपावरून पेच निर्माण झाला होता. मात्र, चर्चेअंती तो यशस्वीरीत्या सोडवण्यात आला.
‘वंचित’ची माघार आणि सत्तेचा फॉर्म्युला
निवडणूक पूर्व आघाडीनुसार काँग्रेसचे ४३ आणि वंचित बहुजन आघाडीचे ४ उमेदवार निवडून आल्याने या युतीचे सभागृहात स्पष्ट बहुमत होते. मात्र, सत्तेत योग्य वाटा मिळावा, यासाठी ‘वंचित’ने सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
समझोता : पुढील अडीच वर्षांच्या टर्ममध्ये उपमहापौरपद वंचित बहुजन आघाडीला देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर, वंचितने आपले अर्ज मागे घेतले. यामुळे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.
राजकीय बलाबल
पक्ष नगरसेवक संख्या
काँग्रेस ४३
भाजप २२
वंचित बहुजन आघाडी ०४
राष्ट्रवादी काँग्रेस ०१
जल्लोषात पदभार स्वीकारला
निवडीची अधिकृत घोषणा होताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. अभिनंदनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर जयश्री सोनकांबळे आणि ॲड. स्नेहल उटगे यांनी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण जाधव आणि वंचितचे मराठवाडा सचिव संतोष सूर्यवंशी यांनी आघाडी कायम असल्याची अधिकृत घोषणा केली.