लातूर मनपात अभियंत्याच्या नियुक्तीवरून रणकंदन; २६ कोटींच्या कामांना महापौरांकडून ‘ब्रेक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:59 IST2026-03-11T12:59:03+5:302026-03-11T12:59:22+5:30

सर्वसाधारण सभा : प्रतिनियुक्ती संपूनही पाणीपुरवठा अभियंत्यावर मेहरबानी का?

Battle over the appointment of an engineer in Latur Municipal Corporation; Mayor puts a 'break' on works worth Rs 26 crore! | लातूर मनपात अभियंत्याच्या नियुक्तीवरून रणकंदन; २६ कोटींच्या कामांना महापौरांकडून ‘ब्रेक’!

लातूर मनपात अभियंत्याच्या नियुक्तीवरून रणकंदन; २६ कोटींच्या कामांना महापौरांकडून ‘ब्रेक’!

लातूर : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा वादळी ठरली. प्रतिनियुक्तीची मुदत संपल्यानंतरही पाणीपुरवठा अभियंत्याकडे महत्त्वाची जबाबदारी का? या प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले, तर दुसरीकडे २६ कोटी १४ लाखांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा ठपका ठेवत महापौर जयश्री सोनकांबळे यांनी या कामांना स्थगिती देऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसचे नगरसेवक आशिष चिकटे यांनी पाणीपुरवठा अभियंता विजयकुमार चव्हाण यांच्या नियुक्तीचा मुद्दा लावून धरला. चव्हाण यांची प्रतिनियुक्ती १४ ऑक्टोबर २०२५ रोजीच संपली आहे. तरीही साडेपाच महिने उलटून गेल्यावर त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७५ फुटी पुतळा आणि आंबेडकर पार्क सुशोभीकरणासारख्या मोठ्या कामांची जबाबदारी का सोपवली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच या कामांसाठी त्यांची शैक्षणिक अर्हता आहे का, याचीही विचारणा करण्यात आली.

२६ कोटींच्या कामांना ब्रेक..!
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या अनेक कामांच्या निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. सुमारे २६ कोटी १४ लाखांच्या या कामांबाबत गंभीर तक्रारी आल्याने महापौर सोनकांबळे यांनी तातडीने या सर्व कामांना स्थगिती जाहीर केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

विरोधी पक्षनेत्यांची पाण्याची बाटली अन् दिलगिरी
सभेदरम्यान गोंधळ वाढल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी संताप व्यक्त करत महापौरांच्या डायसच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावली. मात्र, डायसवर महापौर जयश्री सोनकांबळे, मनपा आयुक्त मानसी मीना आणि नगर सचिव अश्विनी देवडे या महिला अधिकारी व पदाधिकारी असल्याचे गांभीर्य लक्षात येताच काळे यांनी तात्काळ आपली चूक मान्य करत सभागृहाची माफी मागितली.

सभेत काय झाले?
सभेचा कालावधी : सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत प्रदीर्घ चर्चा.
महत्त्वाच्या निवडी : स्वीकृत नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, परिवहन समिती आणि प्रभाग समिती सदस्यांच्या निवडी पार पडल्या.
सहभाग : काँग्रेस गटनेते विजयकुमार साबदे, दीपक सूळ, राष्ट्रवादीचे विक्रांत गोजमगुंडे, वंचितचे अमोल लांडगे, सचिन गायकवाड, भाजपचे दीपक मठपती, रागिणी यादव, गिरीश पाटील, रविशंकर जाधव यांनी चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला.

Web Title : लातूर मनपा में इंजीनियर नियुक्ति पर हंगामा, 26 करोड़ के काम रुके

Web Summary : लातूर मनपा की बैठक में इंजीनियर की नियुक्ति और कथित निविदा अनियमितताओं पर हंगामा हुआ। महापौर ने जांच के लिए ₹26 करोड़ की परियोजनाओं को रोक दिया। एक पार्षद ने गुस्से में पानी की बोतल फेंकी, बाद में माफी मांगी।

Web Title : Latur Municipal Corporation Meeting Disrupted Over Engineer Appointment, Work Halted

Web Summary : Latur's municipal meeting saw chaos over an engineer's appointment and alleged tender irregularities. Projects worth ₹26 crore were halted by the mayor for investigation. A corporator threw a water bottle in anger, later apologizing for the act.