लातूर लोकसभेसाठी ५५.३८ टक्के मतदान, एका गावचा बहिष्कार कायम

By हणमंत गायकवाड | Published: May 7, 2024 07:11 PM2024-05-07T19:11:34+5:302024-05-07T19:13:33+5:30

उन्हाचा चटका लक्षात घेता सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.

55.38 percent polling for Latur Lok Sabha, boycott of one village remains | लातूर लोकसभेसाठी ५५.३८ टक्के मतदान, एका गावचा बहिष्कार कायम

लातूर लोकसभेसाठी ५५.३८ टक्के मतदान, एका गावचा बहिष्कार कायम

लातूर : लातूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवार, ७ मे रोजी मतदान झाले असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.३८ मतदान झाले होते. उन्हाचा चटका लक्षात घेता सकाळीच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. अनेक मतदान केंद्र सजविल्याने मतदारांमध्ये उत्सुकता वाढली होती. चाकूर तालुक्यातील वडवळ येथील मतदान केंद्राबाहेर वनौषधीचे महत्त्व या विषयावरील स्टॉल मतदारांचे आकर्षण ठरले. दरम्यान, लातूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान झाले.

अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील सुनेगाव सांगवी येथे मतदारांनी बहिष्कार टाकला होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नव्हते. बूथ क्रमांक ४४ वर एकूण ४७७ मतदार आहेत. त्यापैकी २५६ पुरुष आणि २२९ महिला मतदार आहेत. प्रशासनाने समजूत काढली. मात्र, मागणी मान्य न झाल्यामुळे मतदारांनी बहिष्कार कायम ठेवला आहे. हा अपवाद वगळता लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये शांततेत मतदान झाले. रेणापूर तालुक्यातील राजेवाडी मतदान केंद्र बांबू व बांबूच्या ताट्ट्यांनी सजविले होते. तर सखी, दिव्यांग, युवा मतदान केंद्रांवर वेगळा उत्साह पाहायला मिळाला.

दरम्यान, लातूर शहर ५३.५६, लातूर ग्रामीण ५७.३७, अहमदपूर ५६.२२, उदगीर ५४.४०, निलंगा ५६.१० आणि लोहा मतदासंघात ५४.९५ टक्के मतदान झाले होते. एकूण लातूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५५.३८ टक्के मतदान झाले होते.

सिनेअभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया यांचे बाभळगाव येथे मतदान...
अभिनेते रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. धीरज देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबीयांनी बाभळगाव येथे मतदान केले.

कोणी कोठे मतदान केले...
क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर तालुक्यातील मलकापूर येथे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी बाभळगाव येथे तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी औराद शहाजानी येथे मतदान केले. आ. रमेश कराड यांनी रामेश्वर येथे मतदान केले असून, आ. बाबासाहेब पाटील यांनी शिरुर ताजबंद येथे हक्क बजावला. भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी लातूर शहरात तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे मतदान केले.

Web Title: 55.38 percent polling for Latur Lok Sabha, boycott of one village remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.