Kolhapur: रेंदाळची खण इचलकरंजीची तहान भागविणार ?, विस्तीर्ण खणीचा गांभीर्याने विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 16:44 IST2025-04-08T16:43:50+5:302025-04-08T16:44:22+5:30
अरुण काशीद इचलकरंजी : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी जलस्त्रोताचा शोध रेंदाळ (ता. हातकणंगले) खण आणि कालव्यापासून सुरू झाला ...

छाया-उत्तम पाटील
अरुण काशीद
इचलकरंजी : इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी जलस्त्रोताचा शोध रेंदाळ (ता. हातकणंगले) खण आणि कालव्यापासून सुरू झाला आहे. रेंदाळपासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टेकडीवर खण असून, तेथील परिसरही विस्तीर्ण आहे. एकूण गायरान क्षेत्रातील ३०.३१ हेक्टर क्षेत्राचे वाटप केले आहे.
इचलकरंजीसाठी दानोळी (ता.शिरोळ) व सुळकूड (ता.कागल) पासून सुरू झालेला पर्यायी पाणी योजनेचा शोध आता रेंदाळ खणीपर्यंत येऊन थांबला आहे. रेंदाळ गावच्या दक्षिणेकडील कारदगा-रेंदाळ मार्गावरील टेकडीवर असणाऱ्या गायरान जागेवर ५ एकर १२५ गुंठ्यांमध्ये लहान-मोठ्या दोन खणी आहेत. २०१७ पासून या खणींचे उत्खनन बंद आहे. या खणींमध्ये दूधगंगा डाव्या कालव्याचे पाणी टाकून तेथून शहराला पाणी देण्याचा विचार शासन करीत आहे.
या टेकडीवर पाच गट असून, ७८.९० हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३०.३१ हेक्टर क्षेत्र बेघर, देवदासी, गावठाण आणि सौरऊर्जेसाठी वाटप करण्यात आले आहे, तर ४८.५९ हेक्टर क्षेत्र शिल्लक आहे. शिल्लक असलेल्या या क्षेत्रांतूनच दूधगंगा डावा कालवा गेला आहे. खणीलगतच कालवा असून, त्यामध्ये झाडे उगवली आहेत.
खणीचा आकारही ओबडथोबड आहे. शहराला येथून पाणीपुरवठा करावयाचा झाल्यास लहान-मोठ्या दोन्ही खणी जोडून घ्याव्या लागणार आहेत. कालव्यालगत घनकचरा डेपोही आहे. तेथेच कचरा आणून टाकला जातो. हे ठिकाण उंचावर असल्याने काही अंतरापर्यंत सायपन पद्धतीने पाणी आणता येऊ शकते, त्यादृष्टीने प्रशासन विचार करण्याची शक्यता आहे.
रेंदाळ खणीची सद्य:स्थिती
- खणीचे ठिकाण - रेंदाळ (रेंदाळ-कारदगा रस्त्यावर)
- खणींची संख्या - २
- मोठ्या खणीचे क्षेत्र - सुमारे ४ एकर
- लहान खणीचे क्षेत्र - सुमारे १ एकर
- खणीची खोली - ३० ते ३५ फूट
- रेंदाळ गावापासून अंतर - सुमारे अडीच किलोमीटर.
- इचलकरंजीपासून अंतर - सुमारे १२ किलोमीटर.
- पाणी साठविण्याची क्षमता - ३ ते ४ दशलक्ष लिटर (अंदाजे)
- कालव्याचे ठिकाण - खणीलगत
- कालव्याची खोली - सुमारे ७० ते ८० फूट
अहवालाची प्रतीक्षा
पर्याय सूचविण्यासाठी नियुक्त करण्यात आलेली समिती विविध अंगाने रेंदाळ खणीचा विचार करीत आहे. १५ एप्रिलपर्यंत अहवाल देणे आवश्यक असल्याने त्यादृष्टीने समिती काम करीत आहे. असे असले, तरी शहरवासीयांना त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.