Kolhapur Municipal Election 2026: कामात टक्केवारी खाणार नाही, आपच्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:00 IST2026-01-10T11:57:38+5:302026-01-10T12:00:22+5:30
महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचे राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून १४ उमेदवार रिंगणात

Kolhapur Municipal Election 2026: कामात टक्केवारी खाणार नाही, आपच्या उमेदवारांचे अनोखे शपथपत्र
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचे राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून १४ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांनी अनोखे शपथपत्र सादर करत, या गोष्टी आम्ही करणार नाही, असे शपथपत्र लिहून दिल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही, माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही, मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही, जनसंपर्कासाठी माझा फोन २४ तास सुरू असेल. मी निवडून आल्यानंतर तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असे हमी देणारे शपथपत्र आपच्या उमेदवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
वाचा : एकाच ॲपवर सर्व दाखले अन् परवाने देणार, महायुतीच्या जाहीरनाम्यात घोषणा
ही निवडणूक फक्त विकासकामांसाठी नसून मनपा राजकारणातील चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी आहे. त्यामुळे जनतेने आपल्याला एक संधी द्यावी, असे आवाहन देसाई यांनी केले.
वाचा : शहरातील महिला, विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत; सतेज पाटील यांची घोषणा
यावेळी उमेदवार उत्तम पाटील, उषा वडर, श्रेया हेगडे, अभिजित कांबळे, समीउल्ला लतीफ, दीप्ती जाधव, अनिल जाधव, मोईन मोकाशी, प्रसाद सुतार, आश्विनी सुर्वे, डॉ. कुमाजी पाटील, पल्लवी तोडकर, मयूर भोसले, शिवानी गजबर उपस्थित होते.