संधी द्या, आंबेओहोळ पुनर्वसन मार्गी लावू; समरजीत घाटगेंनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 18:03 IST2024-10-31T17:59:36+5:302024-10-31T18:03:52+5:30
पालकमंत्र्यांनी २७ बैठका घेतल्या, तरीही प्रश्न प्रलंबित

संधी द्या, आंबेओहोळ पुनर्वसन मार्गी लावू; समरजीत घाटगेंनी दिली ग्वाही
उत्तूर : चित्रकार बाबासाहेब कुपेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आंबेओहोळ प्रकल्पाकडे पाहिले जाते. त्यांच्या पश्चात निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी २२७.५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे भाग्य मला लाभले. गेल्या पाच वर्षांपासून या धरणामध्ये पाणी साठवले जात आहे. मात्र, पालकमंत्र्यांनी २७ बैठका घेऊनही या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित का आहेत? असा खडा सवाल महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांनी उपस्थित केला. आमदारकीची एक संधी द्या, पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावतो, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
होन्याळी (ता. आजरा) येथे आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता पाटील होत्या. घाटगे पुढे म्हणाले, प्रकल्पाच्या पूर्णत्वातून कुपेकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी होती. मात्र, पंचवीस वर्षे आमदार, मंत्री विशेषत: जलसंपदा खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे दुर्लक्ष केले. तालुक्यातील विकासकामांप्रमाणे पुनर्वसनाच्या प्रश्नातही त्यांचे ठेकेदार या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक करत आहेत.
उद्धवसेनेचे भिकाजी मोरबाळे म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील.
आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपत देसाई म्हणाले, शरद पवार यांच्यामुळे गतवेळी आम्ही पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला. मात्र, त्यांनी उत्तूर विभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. विशेषतः आंबेओहोळसारख्या प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मंत्री असूनही त्यांना सोडविता आला नाही. ही धमक छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे यांच्याकडे आहे. यावेळी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असून, त्यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. यावेळी एस. एस. पाटील, उपसरपंच तानाजी गुरव, सचिन उंचावळे, संगीता देऊस्कर,जयश्री जाधव,शंकर कांबळे, संजय कांबळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.