कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वाधिक मतदार, सर्वात कमी कुठे.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:59 IST2025-11-21T19:57:12+5:302025-11-21T19:59:22+5:30
२०१५ च्या निवडणुकीनंतर किती मतदार वाढले...वाचा

कोल्हापूर महापालिकेत प्रभाग क्रमांक २० मध्ये सर्वाधिक मतदार, सर्वात कमी कुठे.. जाणून घ्या
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. एकूण ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांची नावे या प्रारूप याद्यात समाविष्ट असून त्यात महिला मतदार सर्वाधिक आहेत. सर्वाधिक मतदारांची संख्या प्रभाग क्रमांक २० मध्ये तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक ३ मध्ये नोंदले आहेत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की, २०१५ च्या निवडणुकीनंतर ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी गुरुवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्याची माहिती पत्रकारांना दिली. २० प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासाठी १५ दिवस लागले. याद्या प्रसिद्ध करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे त्या अधिक निर्दोष करण्यास अवधी मिळाला. प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्या शहरातील चारही विभागीय कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. प्रारूप याद्यांवर दि. २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेण्याची संधी देण्यात आली आहे.
प्राप्त हरकतींवर सहायक आयुक्त, उपशहर अभियंता जाहीर सुनावणी घेतील. त्यानंतर दि. ५ डिसेंबरला त्या अंतिम स्वरुपात प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, असे मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे २ लाख ४९ हजार ९४० तर पुरुष मतदारांची संख्या २ लाख ४४ हजार ७३४ इतकी आहे. ३७ मतदार हे तृतीयपंथी आहेत. २०१५ च्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीसाठी तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत.
पाच सदस्य निवडून द्यायच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये ३२ हजार ६१५ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार २० हजार १०६ हे प्रभाग क्रमांक ३ मध्ये नोंदले गेले आहेत. प्रत्येक प्रभागाची मतदार संख्या ही सरासरी २४ हजार ४०० इतकी असावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे होते. त्यानुसार या याद्या तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सर्वात जास्त मतदार असलेला परिसर कोणता..?
प्रभाग क्रमांक २० : साळोखेनगर, राजलक्ष्मीनगर,आपटेनगर, कणेरकरनगर, कळंबा जेल,जीवबा नाना पार्क. पुईखडीपर्यंत
सर्वात कमी मतदार असलेला परिसर कोणता..?
प्रभाग क्रमांक ३ : शाहू मार्केट यार्ड, शाहू मिल कॉलनी,तावडे हॉटेल चौक, हॉटेल पर्ल पासून राजगौरव मंगल कार्यालय,बापट कॅम्प, गांधीनगर रस्ता, उचगांव ग्रामपंचायतीपासून शाहूपुरी बेकर गल्लीपर्यंत..
प्रभाग क्र. / पुरुष / स्त्री / इतर / केंद्रामधील निव्वळ मतदार
१. / १२,५७४ / १२,४४६ / २ / २५,०२२
२. / १२, ५६१ / १२,६५७ / ०/ २५,२१९
३. / ९८७२ / १०,२२९ / ५ / २०,१०६
४. / ११,२०८ / ११,९७६ / २ / २३,१८६
५. / ११,२२५ / ११,२११ / ० / २२,४३६
६. / १२,४३१ / १२,६३१ / ० / २५,०६२
७. / १२,०७४ / १२,२५६ / १ / २४,३३१
८. / १२,२५५ / १२,३८२ / ६ / २४,६४३
९. / १३,१६४ / १३,१०९ /० / २६,२७३
१०. / १२,११८ / १२,४६५ / १ / २४,५८४
११. / १२,७०९ / १३,३५५ / ४ / २६,०६८
१२. / १४,९५९ / १५,११२ / ० / ३०,०७१
१३. / १२,४६८ / १२,६४५ / ३ / २५,११६
१४. / ११,८८९ / १२,५४२ / ३ / २४,४३४
१५. / १२,३७७ / १३,०६७ / १ / २५,४४५
१६. / १०,९०० / ११,७४१ / ३ / २२,६४४
१७. / १०,२१० / १०,२२८ / ४ / २०,४४२
१८. / १०,२१५ / १०,८०४ / १ / २१,०२०
१९. / १३,०११ / १२,९८३ / १ / २३,९९५
२०. / १६,५१४ / १६,१०१ / ० / ३२,६१५
एकूण - २,४४,७३४ / २,४९,९४० / ३७ / ४,९४,७११