Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ
By संदीप आडनाईक | Updated: January 15, 2026 10:33 IST2026-01-15T10:29:28+5:302026-01-15T10:33:03+5:30
मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला

Kolhapur Municipal Election Voting 2026: मतदानासाठी सकाळपासूनच रांगा, कोल्हापूरकरांचा दांडगा उत्साह; अनेक ठिकाणी यादी, बूथ घोळाने मतदारांची धावपळ
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या दहाव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज, गुरुवारी शहरातील ५९५ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता उत्साहात मतदानास सुरुवात झाली. २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान होत असून, अनेक ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासूनच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र, मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा खोळंबा झाला. सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांमध्ये ९.६४ टक्के मतदान झाले.
अनेक प्रभागांमध्ये उमेदवार व निवडणूक यंत्रणेकडून मतदार स्लिपचे वाटप न झाल्याने मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी बूथवर धावपळ करावी लागत आहे. हायटेक यंत्रणेद्वारे मतदार चिठ्ठ्या काढण्याची सुविधा असली, तरी त्याची माहिती नसल्याने अनेक मतदार संभ्रमात आहेत. काही मतदान केंद्रांवर ज्या बूथवर मतदान आहे, त्या यादीतच नाव नसल्याने नाराजी व्यक्त करत अनेक मतदार परत फिरताना दिसले.
मतदारांची नावे घरापासून दूरच्या मतदान केंद्रांवर गेल्याने पायपीट वाढली आहे. मतदार ॲप संथ असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या. काही ठिकाणी बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे, तर काही मतदारांच्या दोन्ही हातांच्या बोटांना शाई लावल्याचे प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. डाव्या हाताऐवजी उजव्या हाताला शाई लावल्याने काहींना दोनदा शाई लावावी लागली.
Maharashtra Municipal Election 2026 Voting Live Updates: मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला; मनसे उमेदवारासमोरच घडला प्रकार
खोली क्रमांक चुकीचे पडल्याने अनेक केंद्रांवर गोंधळ उडाला. चार मते द्यायची असल्याने मतदानास वेळ लागत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक गोंधळलेले दिसत आहेत. लक्षतीर्थ वसाहतीतील एका मतदान केंद्रावर तीन मशीनवर कालची तारीख दिसत असल्याने मतदान सुरू होण्यास उशीर झाला.
प्रभाग ९ मधील एकजुटी मंदिर येथील मतदान केंद्र क्रमांक २९ व ३० येथे सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाले. मात्र, १०० मीटर नियम धाब्यावर बसवत मतदान केंद्रांसमोरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्याने तणाव निर्माण झाला. हरकत घेतल्यानंतर तैनात पोलिसांनी वाहने हटवली. या केंद्रांवर सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लागल्या होत्या.
एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विभागली गेल्याने मतदारांचा वेळ व ऊर्जा खर्ची पडत आहे. केंद्राबाहेर यादी तपासण्याची सोय नसल्याने पक्ष कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू आहे. या सगळ्या गोंधळामुळे अनेक मतदारांमध्ये नाराजी व मनस्ताप व्यक्त होत आहे.