Union Budget 2022 : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, माजी खासदार राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 17:21 IST2022-02-01T16:56:09+5:302022-02-01T17:21:50+5:30
ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचे खुशाल समर्थन करावे

Union Budget 2022 : शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा अर्थसंकल्प, माजी खासदार राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया
कोल्हापूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात कृषी, महिला, बँकिंग, सहकार, कॉपोरेट क्षेत्र, डिजिटल सेवा यासह अनेक क्षेत्राबाबत सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या अर्थसंकल्पावरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला सगळा शेतीमाल हमीभावाने खरेदी करणार असे अर्थमंत्री सांगतात त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. मात्र आठवण करुन देतो की गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदीसाठी २ लाख ४७ हजार कोटीची तरतूद केली होती. पण सरकारने सगळा शेतीमाल खरेदी केला नाही. मात्र पैसे सगळे खर्च झाले. मात्र शेतकऱ्यांमध्ये कुठे आनंद दिसला नाही.
यावर्षी त्यामध्ये १० हजार कोटीची कपात केली आहे. २ लाख ३७ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. म्हणजे गेल्यावर्षी पेक्षा १० हजार कोटींनी जी तरतूद कमी आहे तिथे स्वागत करण्यासारखे आहेच काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शिवाय गेल्या वर्षी एकूण बजेटच्या ४.३६ टक्के तरतूद शेतीसाठी होती. यावर्षी ती ३.७६ इतकी करण्यात आली आहे. म्हणजे पाऊण टक्क्यांनी शेतीचे बजेट कापण्यात आले आहे. त्यामुळे या बजेट स्वागत का करायचं असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ज्यांना राज्यकर्त्यांना खूश करायचं आहे आणि लाभ पदरात पाडून घ्यायचा आहे त्यांनी या बजेटचे खुशाल समर्थन करावे. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आणि शेतकऱ्यांला खड्ड्यात घालणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.