कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर दोन हजार पोलिस, दीड हजार होमगार्डची नजर; महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 12:04 IST2025-09-05T12:03:19+5:302025-09-05T12:04:13+5:30
ध्वनियंत्रणा, लेसरवर नजर; पोलिस अधीक्षकांची माहिती

कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीवर दोन हजार पोलिस, दीड हजार होमगार्डची नजर; महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज
कोल्हापूर : अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांसाठी जिल्ह्यात दोन हजार पोलिस, दंगल काबू पथकांसह शीघ्र कृती दलाची २२ पथके आणि दीड हजार होमगार्ड तैनात केले आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत बंदोबस्त तैनात राहणार आहे. यावेळी मंडळांच्या ध्वनियंत्रणा आणि लेसरवर विशेष नजर राहणार आहे. तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेशकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकांच्या बंदोबस्ताचे नियोजन पोलिसांकडून पूर्ण झाले आहे. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि इतर शहरांंमध्ये शनिवारी सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून ५०० पोलिसांसह शीघ्र कृती दलासह एसआरपीएफच्या पाच तुकड्या मागवल्या आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुका संपवण्याचा प्रयत्न असेल. मिरवणूक रेंगाळत राहू नये, यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. रात्री १२ वाजता वाद्यांचा आवाज बंद होईल. लेसरचा वापर आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर जागेवरच कारवाई केली जाईल, असे अधीक्षक योगेश कुमार यांनी स्पष्ट केले.
२५१ मंडळांवर खटले दाखल
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्ह्यातील २५१ मंडळांवर ध्वनिप्रदूषण कायद्यानुसार न्यायालयात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करून ध्वनियंत्रणेत प्रेशर मीड तंत्राचा वापर केल्याबद्दल नांगरगाव (ता. भुदरगड) येथील मोरया साम्राज्य गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि ध्वनियंत्रणा मालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांची ध्वनियंत्रणा जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.
पोलिसांकडून ७१० बैठका
पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ७१० बैठका घेतल्या. गणेश मंडळांच्या ४१५, ध्वनियंत्रणा मालकांच्या ३५, मोहल्ला कमिटी ४६, शांतता कमिटी ५९, पोलिस मित्र ३५, मौलाना-मौलवी ९८ आणि इतर विभागांच्या २२ अशा एकूण ७१० बैठका झाल्या.
स्ट्रक्चर जोडणीवर नजर
मंडळांना १२ बाय १० फुटांचे स्ट्रक्चर जोडण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. मोठ्या आकाराचे स्ट्रक्चर जोडले जाऊ नयेत, यासाठी शुक्रवारी सायंकाळपासूनच मंडळांवर पोलिसांची नजर असेल. आवाजाच्या नोंदी करण्यासाठी सर्व पोलिस ठण्यांना नॉईज लेव्हल मीटर पुरवल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
असा आहे बंदोबस्त
कोल्हापूर शहर : अतिरिक्त पोलिस अधीक्षक : १, उपअधीक्षक : ७, पोलिस निरीक्षक : २५, सपोनि, उपनिरीक्षक : १०५, कॉन्स्टेबल : ७४०, होमगार्ड : ५५५, स्ट्रायकिंग पथक, शीघ्र कृती दल : २, दंगल काबू पथक : २, एसआरपीएफ तुकडी : १,
इचलकरंजी : अतिरिक्त पोलिस अधीक्षक : १, उपअधीक्षक : २, पोलिस निरीक्षक : ४, सपोनि, उपनिरीक्षक : २४, कॉन्स्टेबल : २१७, होमगार्ड : १७७, शीघ्र कृती दल : १, एसआरपीएफ तुकडी : १
मनपाचे तीन हजार कर्मचारी विसर्जनासाठी राबणार
महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. इराणी खणीवर चार क्रेन व १० फ्लोटिंग तराफ्यांची सोय केली असून विसर्जनाच्या कामासाठी पवडी, आरोग्य, उद्यान व इतर विभागांचे सुमारे ३ हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर १०० टेंपो, ४१५ हमाल, ५ जेसीबी, ७ डंपर, ४ पाणी टँकर, २ बूम, ६ ॲम्ब्युलन्स व इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विसर्जन मार्गावरील धोकादायक इमारतीभोवती बॅरिकेड्स उभारून सूचना फलक लावण्यात येणार असून, नागरिकांनी या इमारतींमध्ये प्रवेश न करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
साफसफाईसाठी आरोग्य कर्मचारी तैनात
आरोग्य विभागाकडून विसर्जन मार्ग व स्थळांवर साफसफाईसाठी आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय पथके नेमली आहेत. विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक संस्था, तरुण मंडळे व तालीम संस्थांच्या अध्यक्षांचे महापालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. तसेच पर्यायी विसर्जन मार्ग हॉकी स्टेडियम येथेही स्वागत कक्ष उभारण्यात येत आहे. या दोन्ही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने श्रीफळ, पान, सुपारी व एक रोप देण्यात येणार आहे. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक व सुरक्षा गार्ड ठेवण्यात येणार आहेत.