Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 14:14 IST2024-07-04T14:13:36+5:302024-07-04T14:14:44+5:30
आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार

Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळावर पर्यटकांना बंदी आदेश
राजू कांबळे
शाहूवाडी : पुणे येथील लोणावळा भूशी डॅम धरणाच्या प्रवाहात पाच पर्यटक वाहून गेले होते. याच पाश्वभुमीवर शाहूवाडी तालुक्यातील पाच पर्यटन स्थळावरील धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या पाच पर्यटन स्थळावर १४४ कलम लागू केल्याची माहिती शाहूवाडीचे न्याय दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी दिली.
तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहू लागले आहेत. डोंगर कपारीतील लहान मोठे धबधबे ओसंडून वाहत आहेत. पावसाळी पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी राज्यातून पर्यटक येत असतात. जोरदार पावसामुळे धरण धबधबे यांचा पाण्याचा प्रवाह वाढत आहे. पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी शाहूवाडीचे न्याय दंडाधिकारी रामलिंग चव्हाण यांनी कांडवन, केर्ले धबधबा, पावनखिंड, मानोली धरण, उखळू धबधबा या पाच पर्यटन स्थळावर जाण्यास बंदी आदेश घालण्यात आला आहे.
आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व नागरीक यांना हा आदेश लागू होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन तहसिल कार्यालयातून करण्यात आले आहे.