Kolhapur Politics: ..तर या निवडणुकीचा अर्जसुद्धा भरणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 18:08 IST2024-06-10T18:07:22+5:302024-06-10T18:08:25+5:30
''माझा कंटाळा आला असेल, तर स्पष्ट सांगा''

Kolhapur Politics: ..तर या निवडणुकीचा अर्जसुद्धा भरणार नाही : मंत्री हसन मुश्रीफ
कागल : गेली २५ वर्षे तुम्ही मला आमदारकी दिली. या काळात १९ वर्षे मंत्रीपदी राहिलो. आपला आमदार भेटावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असते. जनसंपर्कामध्ये कधीही कमतरता ठेवली नाही. सामान्यातील सामान्य अगदी एक जरी माणूस येऊन म्हणाला की, मी घरात असून भेटलो नाही किंवा फोन उचलला नाही, तर या निवडणुकीचा अर्जसुद्धा भरणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कागल गडहिंग्लज उत्तुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा येथील शाहू हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला होता, तेव्हा मंत्री मुश्रीफ बोलत होते. सातव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा जात आहे. गेल्या सहा निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीतही मला आशीर्वाद द्या. तुमचा भाऊ आणि मुलगा समजून ओट्यात घ्या आणि मायेची उब द्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.
यावेळी युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, प्रकाश गाडेकर, सिद्धार्थ बन्ने, तात्यासाहेब पाटील, प्रवीणसिंह भोसले, बाळासाहेब तुरबे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात कागल शहरातील समरजीत घाटगे यांचे कार्यकर्ते देवराज बेळीकट्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. विजय काळे, चंद्रकांत पाटील, किरण कदम भय्या माने यांचीही भाषणे झाली. नितीन दिंडे यांनी स्वागत, तर संजय चितारी यांनी आभार मानले.
माझा कंटाळा आला असेल, तर स्पष्ट सांगा
मंत्री मुश्रीफ म्हणाले माझा तुम्हाला कंटाळला आला असेल, तर जरूर स्पष्टपणे सांगा. दुसरा कुणीतरी उमेदवार काढू. माझ्या चुकासुद्धा तोंडावर सांगा, माफी मागेन. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे शंभर टक्के समाधान करता येत नाही. परंतु, काही राहून गेले असल्यास जरूर सांगा, ते पूर्तता करण्याचाही प्रयत्न करू, असे म्हणताच वातावरण भावनिक झाले. यावर उपस्थितीत कार्यकर्त्यांनी नाही नाही असा गजर केला.