Kolhapur Municipal Election 2026: मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:48 IST2026-01-02T16:47:44+5:302026-01-02T16:48:46+5:30
शहरात किती आहेत मतदान केंद्रे.. वाचा

संग्रहित छाया
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदान यंत्रांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली. तपासण्यात आलेल्या एक हजार कंट्रोल युनिटसह सर्व दोन हजार मतदान यंत्रे दि. ६ जानेवारीनंतर सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार आहेत.
नामनिर्देशनपत्रे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मतदानाच्या तयारीला वेग आला आहे. शासकीय गोदाम येथे ठेवण्यात आलेली कंट्रोल युनिट व मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली. तंत्रज्ञांच्या तीन पथकांतील कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून ही तपासणी केली जात होती. सर्व यंत्रे सुस्थित असल्याची खात्री करुन घेण्यात आली आहेत. ही यंत्रे दि. ६ जानेवारी रोजी शहरातील सातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दिली जाणार आहेत.
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार केल्यानंतर आता मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तयार केल्या जात आहेत.त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता दुसरे प्रशिक्षण दि. ६ जानेवारी रोजी आहे. सायबर कॉलेज, व्ही.टी. पाटील सभागृह, राजाराम कॉलेज, गडकरी हॉल येते हे प्रशिक्षण होणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.
शहरात ५९५ मतदान केंद्रे
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ५९५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक केंद्राला एक बीएलओ देण्यात येणार आहे. या बीएलओ मार्फत सर्व मतदारांना मतदार ओळखपत्रे वाटली जाणार आहेत.
चार ठिकाणी मतमोजणी
शहरात चार ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सभागृह, हॉकी स्टेडियम, महासैनिक हॉल येथील निवडणूक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदामात मतमोजणी होईल. व्ही. टी. पाटील सभागृहात व्ही. टी. पाटील भवन व राजोपाध्येनगर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतर्गत प्रभागांची मतमोजणी होईल, तर गांधी मैदान पॅव्हेलियन व दुधाळी पॅव्हेलियन येथील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या प्रभागांची मतमोजणी त्या त्या कार्यालयात होणार आहे.