कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत 'दणदणाट', लेसर किरणांचा झगमगाट-video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:10 IST2025-08-28T16:09:43+5:302025-08-28T16:10:04+5:30

भक्तांचा महापूर : पावसाने उसंत दिल्याने तरुणाईचा उत्साह अनावर

The sound system was blaring loudly during the arrival procession of Shri at Rajarampuri in Kolhapur | कोल्हापुरात राजारामपुरीमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत 'दणदणाट', लेसर किरणांचा झगमगाट-video

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : साऊंड सिस्टिमचा कानठळ्या बसवणारा आणि हृदय धडधडणारा आवाज, लेसर, विद्युत रोशणाईचा झगमगाट, नृत्य करणारी तरुणाई, भक्तांचा महापूर अशा वातावरणात बुधवारी रात्री राजारामपुरीत गणेश आगमनाची मिरवणूक झाली. पावसाने उसंत दिल्याने मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी झाली होती. भाविकांचा उत्साह अनावर झाला होता.

गणेशोत्सवानिमित्त राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास एका पाठीमागून एक असे सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीची मूर्ती, देखावे मिरवणुकीत सहभागी होत राहिले. राजारामपुरी, विक्रमनगर, टेंबलाईवाडी परिसरातून मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती. बहुतांशी मंडळांनी ट्रॅक्टर ट्रॉलीवर भव्य स्ट्रक्चर बांधून त्यावर साऊंड सिस्टिम लावले होते. मूर्तीच्या पुढे देखावे होते. यासमोर अखंडपणे लोकप्रिय चित्रपटांच्या गाण्यावर तरुणाई थिरकत राहिली. 

रात्री आठच्या सुमारास मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीतही तरुण, तरूणी बहोश होऊन नृत्य करीत होते. गर्दी अधिक आणि रस्ता अरुंद असलेल्या ठिकाणी ढकलाढकलीचे प्रकार झाले. अशावेळी बंदोबस्तावर असलेले पोलिस महिला, वयोवृध्द महिलांना वाट करीत देत होते. मध्यरात्रीपर्यंत मिरवणूक सुरू होती.

पाऊस नसल्याने..

दोन, तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने सायंकाळी उसंत घेतली. यामुळे राजारामपुरीतील आगमन मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली नाही. मिरवणुकीत साऊंड सिस्टिम, मूर्ती, विद्युत रोशणाई अखंडपणे सुरू राहिली.

कानात बोळे घालून बंदोबस्त; पण..

राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत साऊंड सिस्टिमचा अमर्याद आवाज वाढला तर विसर्जन मिरवणुकीत कोणीही विचारत नाही, असा मंडळाचा समज असतो. म्हणून यंदाही याकडे अनेकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या; पण मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वच मोठ्या मंडळांनी साऊंड सिस्टिम लावले होते. त्यावरील अमर्याद आवाजामुळे बंदोबस्तात असलेले पोलिसही कानात बोळे घातल्याचे दिसत होते.

मुख्य मार्ग उजळून निघाला..

मंडळांनी केलेल्या विद्युत रोशणाई, लेसरमुळे राजारामपुरीचा मुख्य मार्ग उजळून निघाला होता. मिरवणुकीनंतर प्रतिष्ठापना करण्याच्या ठिकाणापर्यंत रोशणाईचा प्रकाश दिसत होता.

Web Title: The sound system was blaring loudly during the arrival procession of Shri at Rajarampuri in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.